- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ४ महिन्यांपासून एसटी बस, रेल्वे वाहतूक ठप्प आहे. शाळाही बंद आहेत. परिणामी, प्रवासी, विद्यार्थी वाहतूक करून उदरनिर्वाह करणाऱ्या जिल्ह्यातील ४५ हजार रिक्षाचालकांचे आर्थिक ‘मीटर डाऊन’ झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात किमान ८० कोटींचे उत्पन्न बुडाले आणि आता तर रोज १०० ते २०० रुपयेही मिळेना झाले. त्यामुळे रिक्षाचालकांना संसाराचा गाडा ओढणे कठीण होत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ३५ हजार ७८२ रिक्षा असल्याची नोंद आरटीओ कार्यालयात आहे. या ३५ हजार रिक्षांवर दिवसा आणि रात्रीच्या वेळी प्रवासी वाहतूक करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षाचालकांची संख्या ४५ हजारांच्या घरात आहे. एका रिक्षाचालकाचे ५ जणांचे कुटुंब धरले तर किमान २ लाख २५ हजार लोकांचे पोट रिक्षावर भरते; परंतु गेल्या महिनाभरापासून दोन वेळच्या जेवणासाठी रिक्षाचालकांना दिवसभर रस्त्यावर उभे राहण्याची वेळ येत आहे. औरंगाबादमार्गे सध्या केवळ सचखंड एक्स्प्रेस धावत आहे. या रेल्वेने जाणारे प्रवासीही स्वत:च्या, नातेवाईकांच्या वाहनाने रेल्वेस्टेशनवर ये-जा करतात. एसटी बंद आहे, शाळा बंद आहेत. कोरोनाच्या भीतीने प्रवासी रिक्षात बसण्याचे टाळत आहेत. जे बसतात, त्यांच्याकडून पुरेसे भाडे मिळत नाही. कोरोनापूर्वी ४०० ते ५०० रुपये घरी नेणाऱ्या रिक्षाचालकाला दिवसभरात २०० रुपये मिळविणेही आता अवघड होत आहे.
मुलांचे शिक्षण, घरभाडे, वीज बिलाचा प्रश्नअनेकांनी रिक्षाचा परवाना काढून रिक्षाच्या खरेदीसाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. अनेक जण रिक्षा भाड्याने घेऊन व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, घरभाडे, औषधोपचार, मुलांचे शिक्षण आदी सर्वच अवलंबून आहे; परंतु सध्या कर्जाचे हप्ते, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरभाडे, विद्युत बिल, औषधोपचार असे अनेक प्रश्न रिक्षाचालकांपुढे निर्माण झाले आहेत. राज्य सरकारने रिक्षाचालकांना आधार देण्याची मागणी होत आहे.
लॉकडाऊनमध्ये दररोज 01 कोटींचे उत्पन्न बुडालेकोरोनापूर्वी एक रिक्षाचालक दिवसभरात पेट्रोलचा खर्च वजा करून किमान ३०० रुपयांची कमाई करीत होता. ३५ हजार रिक्षांचा विचार केला तर १ कोटी ७ लाख ३४ हजारांचे उत्पन्न होते, तर महिनाभरात २५ दिवसांच्या हिशोबाने २६ कोटी ८३ लाख ६५ हजार रुपयांचे उत्पन्न होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात या रिक्षाचालकांचे किमान ८० कोटींचे उत्पन्न बुडाले.
यांनाही आर्थिक फटका सध्या रिक्षा दुरुस्ती करण्याचे टाळले जात आहे. लॉकडाऊन काळात रिक्षामध्ये पेट्रोल भरण्याची वेळ आलीच नाही. त्यामुळे रिक्षाची देखभाल-दुरुस्ती करणारे कारागीर, कुशन वर्क करणारे कारागीर, ग्रीसिंग करणारे कामगार, वॉशिंग करणारे, पेट्रोलपंप यांनाही रिक्षाचालकांच्या परिस्थितीचा फटका बसत आहे.
४० हजारांचे उत्पन्न बुडाले रिक्षांना दोन प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आलेली आहे; परंतु रेल्वे, एसटी बंद आहे. शाळाही बंद आहेत. त्यामुळे भाडे मिळत नाही. कोरोनापूर्वी रोज किमान ५०० रुपये मिळत होते. महिन्याला १० ते १२ हजार रुपये कमावत होतो; परंतु चार महिन्यांत किमान ४० हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. - कैलास शिंदे, रिक्षाचालक
शंभर रुपयेही मिळविणे अवघडलॉकडाऊनमुळे जवळपास तीन महिने रिक्षा जागेवर उभ्या होत्या. या तीन महिन्यांत एक रुपयाही हाती पडला नाही. आता रिक्षा सुरू आहेत; परंतु दिवसभर प्रवाशांची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे. दिवसभरात १०० ते २०० रुपयेही मिळविणे अवघड आहे.-निसार अहेमद खान, अध्यक्ष, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ
दुरुस्तीसाठी आता एखादी रिक्षाआधी दिवसभरात किमान ४ ते ५ रिक्षा दुरुस्तीसाठी येत असत; परंतु आता दिवसभरात एखादी रिक्षाही दुरुस्तीसाठी येणे अवघड झाले आहे. कारण रिक्षाचालकांचाच व्यवसाय होत नाही, मग दुरुस्तीसाठी कसे येणार. त्यांचा व्यवसाय चालला तर आमचा व्यवसाय चालेल.- शेख नावेद शेख वाहेद, रिक्षा कारागीर
पेट्रोल विक्री ६० टक्क्यांवरसध्या पेट्रोल विक्री ६० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, वीज बिल आदींना सामोरे जावे लागत आहे. सर्व वाहतूक सुरळीत झाल्यानंतरच परिस्थिती पूर्वपदावर येईल.- अकिल अब्बास, सचिव, पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन औरंगाबाद
कर्जाचे हप्तेही भरता येईनालॉकडाऊन काळात उधारीवर दिवस काढले. आता तर उधारीही मिळणे बंद झाले आहे. सध्या रोज १०० ते २०० रुपये मिळविण्यात संपूर्ण दिवस जातो. कर्जाचे हप्ते थकत आहेत. कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न आहे. प्रत्येक रिक्षाचालकाची अशीच अवस्था झाली आहे.- गोपीनाथ शेळके, रिक्षाचालक