औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली. पूर्वी औरंगाबादहून सकाळी ६ वाजता सुटणारी ही रेल्वे आता सकाळी ९.३० वाजता सुटत आहे. ही वेळ औरंगाबादच्या गैरसोयीची ठरत आहे. कारण, मुंबईत पोहोचेपर्यंत सायंकाळ होते आणि मुंबईतील शासकीय आणि खासगी कार्यालये बंद होतात. त्यातून प्रवाशांसह व्यापारी, व्यावसायिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रेल्वेची वेळ पूर्वीप्रमाणे करण्याची मागणी जोर धरत आहे. ( The changed times of ‘Janshatabdi’ express are inconvenient for Aurangabadkars )
जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची रेल्वे आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे ११ महिने ही रेल्वे ठप्प होती. १४ फेब्रुवारीपासून ही रेल्वे पुन्हा सुरू झाली. जनशताब्दी एक्स्प्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. परंतु, या रेल्वेची वेळ बदलण्यात आली आहे. ही रेल्वे पूर्वी सकाळी ६ वाजता औरंगाबादहून सुटत असे. नव्या वेळापत्रकानुसार ही रेल्वे आता सकाळी ९.२० वाजता सुटते. मुंबईत ही रेल्वे सायंकाळी साडेचार वाजता दाखल होते. शिवाय, ही रेल्वे मुंबईत पोहोचण्यापूर्वीच मुंबई सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस सुटते. त्यामुळे या वेळापत्रकाविषयी नाराजी व्यक्त करीत पूर्वीप्रमाणेच या रेल्वेची वेळ करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
मुंबईत मुक्कामाची वेळपूर्वी सकाळी ६ वाजता जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादहून सुटत असे आणि दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान मुंबईत पोहोचत असे. त्यामुळे सकाळी मुंबईतील काम आटोपून नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसने त्याच दिवशी परतीचा प्रवास प्रवाशांना करता येत असे. परंतु, आता मुंबईत मुक्काम करण्याची वेळ येत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
मुंबईत पोहोचेपर्यंत कार्यालये बंदकामानिमित्त मुंबईला नेहमी ये-जा करावी लागते. जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलली. परंतु, मुंबईतील कार्यालयांची वेळ बदलली नाही. जनशताब्दीने आता मुंबईत पोहोचेपर्यंत कार्यालये बंद होतात. त्यामुळे ही रेल्वे पूर्वीप्रमाणे औरंगाबादहून सकाळी ६ वाजताच धावली पाहिजे.- नंदलाल दरख, प्रवासी