वातावरणानुसार होतोय डासांमध्ये बदल : पावसाळ्यानंतर आढळणारा डेंग्यू आता कमी-अधिक प्रमाणात वर्षभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:01 AM2018-12-27T00:01:24+5:302018-12-27T00:01:34+5:30
औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचा विळखा तिपटीने वाढला आहे. विशेष म्हणजे वातावरणानुसार डासांमध्ये बदल होत आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूचा विळखा तिपटीने वाढला आहे. विशेष म्हणजे वातावरणानुसार डासांमध्ये बदल होत आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर होणारी डेंग्यूची लागण आता कमी-अधिक प्रमाणात वर्षभर होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागतो. त्यामुळे पावसाळ्याला सुरुवात होताच आरोग्य विभागाकडून कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यावर भर दिला जातो. शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात येतात. या सगळ्यानंतरही आरोग्य विभागाला यंदा डेंग्यूवर नियंत्रण मिळण्यात अपयश आल्याचे दिसते.
आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे आहेत. या चारही जिल्ह्यांमध्ये २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तिप्पट झाली आहे. डेंग्यूच्या रुग्णांत डोकेदुखी, सांधे, अंग दुखणे, डोळ्यामागे वेदना, अशी लक्षणे असतात. डेंग्यूमध्ये प्लेटलेटचेही प्रमाण कमी होते. ९५ टक्के रुग्णांमध्ये गंभीर परिस्थिती नसते. परंतु डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
उन्हाबरोबर थंडीतही विषाणू
पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. परंतु यंदा मे महिन्यात चार जिल्ह्यांत एकूण २१ रुग्ण आढळले. विशेष म्हणजे गतवर्षी मे महिन्यात एकही रुग्ण नव्हता. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अनुक्रमे ६५ आणि २६ रुग्ण आढळले. त्यामुळे उन्हाबरोबर थंडीतही डेंग्यूचे विषाणू वाढत असल्याचे दिसते.
विषाणूजन्य आजार
डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. कमी तीव्रता, मध्यम तीव्रता आणि अधिक तीव्रता स्वरुपात त्याची लागण होते. पावसाळ्यानंतर लागण होणारा डेंग्यू आता वर्षभर ठाण मांडत आहे. थंडीमध्येही डेंग्यूची लागण होताना दिसत आहे.
- डॉ. मकरंद दिवाण, उपाध्यक्ष, भारतीय बालरोग संघटना
५ टक्के रुग्ण गंभीर
डेंग्यूच्या डासांकडून वातावरणाला अनुसरून बदल केला जात असल्याचे दिसते. त्यामुळे वर्षभर कमी-अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. डेंग्यूची लागण होत असली तरी ९५ टक्के लोकांमध्ये कोणतीही गंभीर परिस्थिती नसते. केवळ ५ टक्के लोकांमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवते.
-डॉ. अभय पोहेकर, फिजिशियन
आॅक्टोबरमध्ये सर्वाधिक रुग्ण
औरंगाबादेत गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर रुग्ण कमी होत गेले आहेत. डास अळी आणि एडिस डासांच्या उत्पत्तीत वाढ झाल्याने ही संख्या वाढल्याचे दिसते.
- अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी