औरंगाबाद : राजाबाजारातील संस्थान गणपती मंदिरातील दानपेटी दोन भुरट्या चोरट्यांनी दारूसाठी पैसे नसल्याने पळविल्याचे समोर आले. गुन्हे शाखा, सिटीचौक पोलिसांनी दोघांना ताब्यातघेत एकाला अटक केली, तर दुसऱ्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन दानपेटीतील सुमारे १५ हजार ३१४ रुपये पोलिसांना परत दिले. दानपेटी नेलेली रिक्षाही पोलिसांनी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरातून रविवारी दुपारी जप्त केली.इब्राहिम खान आलम खान (वय ३२) याला अटक केली असून, पिराजी संजय सोनवणे (वय ३०, रा. पडेगाव) याला घाटीत दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, इब्राहिम खान भाड्याची रिक्षा चालवितो. पिराजी त्याचा मित्र आहे. दोघेही एकाच वसाहतीत राहतात. दोघांना दारूचे व्यसन आहे. शनिवारी रात्री रिक्षाला भाडे न मिळाल्याने त्यांच्याकडे पैसे नव्हते. दारूसाठी पैसे मिळविण्याच्या उद्दैशाने रात्री ते शहरात आले. संस्थान गणपती मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस पहाटे चार वाजेनंतर गायब होतात, हे त्यांना माहीत होते. त्यामुळे मंदिरापासून काही अंतरावर रिक्षा उभी करून इब्राहिमने प्रथम पिराजीला संस्थान गणपती मंदिराकडे पाठविले. आजूबाजूला कोणीही नसल्याचे पाहून पिराजीने इब्राहिमला इशारा केला. त्यानंतर इब्राहिम रिक्षा घेऊन मंदिरासमोर येऊन थांबला. पिराजीने मंदिरात जाऊन दानपेटी उचलून मंदिराच्या कठड्याबाहेर उभ्या इब्राहिमकडे दिली. दोघांनी मिळून ती दानपेटी रिक्षात ठेवली आणि अवघ्या अर्ध्या मिनिटात दानपेटी चोरून ते रिक्षाने पळून गेले होते.याप्रकरणी रमेश घोडेले यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटिव्ही कॅमेºयांच्या फुटेजची तपासणी करून रिक्षा पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरातून शोधून काढली. मात्र, संशयित इब्राहिम खान हा घरी न सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि कर्मचाºयांनी मध्यरात्रीनंतर इब्राहिमला पकडले. सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब सिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र बांगर आणि कर्मचाºयांनी आरोपी पिराजीला दारूच्या नशेत असताना वसंत भवनसमोर पकडले. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत दानपेटीतील रकमेपैकी १५ हजार ३१४ रुपये काढून दिले.चौकटदानपेटी विहिरीत फेकलीपळविलेली दानपेटी फोडून त्यातील पैसे काढल्यानंतर ती एका विहिरीत फेकून दिल्याचे आरोपींनी सांगितले. दानपेटी कोठे फेकली, हे मात्र ते सांगत नाहीत. इब्राहिमला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दि. २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दारूसाठी चोरली संस्थान गणपती मंदिरातील दानपेटी; दोघांना पकडले, एकाला घाटीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:41 PM