छत्रपती संभाजीनगर महापालिका महावितरणला वीज देणार; ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती सुरू

By मुजीब देवणीकर | Published: December 23, 2023 11:16 AM2023-12-23T11:16:46+5:302023-12-23T11:20:02+5:30

कांचनवाडी बायोमिथेन प्रकल्पाची दररोज ३५ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation will provide electricity to Mahavitaran; Electricity generation from wet waste started | छत्रपती संभाजीनगर महापालिका महावितरणला वीज देणार; ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती सुरू

छत्रपती संभाजीनगर महापालिका महावितरणला वीज देणार; ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती सुरू

छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती सुरू करण्यात आली. महापालिका ही वीज महावितरणला देणार आहे. १ जानेवारीपासून दररोज किती वीजनिर्मिती सुरू आहे, याचे मोजमाप केले जाईल. कांचनवाडी येथील एसटीपी प्लांटला लागणारा विजेचा खर्चही कमी होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने महापालिकेला २०१७ मध्ये घनकचऱ्यासाठी खास १४६ कोटी रुपयांचे अनुदान दिले. या अनुदानातून पडेगाव, चिकलठाणा, हर्सूल येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले. या तिन्ही केंद्रांत कचऱ्यापासून खतनिर्मितीही सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत कांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यापासून बायोमिथेन तयार करण्याचा प्रकल्प राबविण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प योग्य चालत नव्हता. शेवटी प्रकल्प बंद करण्याची नामुष्की मनपावर ओढावली होती. प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेऊन कंपनीला बायोमिथेनपासून वीजनिर्मिती करण्याची मुभा दिली. काही महिन्यांतच हा प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू झाला. नुकतीच प्रकल्पाची चाचणीही घेण्यात आली. सध्या या प्रकल्पातून २४०० युनिट वीजनिर्मिती दररोज होत आहे. ही वीज शेजारीच असलेल्या एसटीपीला (मल जल निस्सारण प्रक्रिया प्रकल्प) दिली जात आहे. १ जानेवारीपासून या विजेचे बिलिंग सुरू होणार आहे, असे उपायुक्त तथा घन कचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

३५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता
कांचनवाडी बायोमिथेन प्रकल्पाची दररोज ३५ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. सध्या दररोज या ठिकाणी २० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. हळूहळू कचरा आणखी वाढविला जाणार आहे, असे जाधव यांनी नमूद केले.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation will provide electricity to Mahavitaran; Electricity generation from wet waste started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.