छत्रपती संभाजीनगर : महापालिका शाळा म्हटले तर प्रशासन, शासन, शिक्षक, पालक उदासीन असल्याचे पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुबक वापर करीत एकाच क्लिकवर विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती दिसावी अशी सोय केली आहे. गुरू ॲपने ही किमया केली असून, त्यासाठी जवळपास ८ लाखांहून अधिकचा खर्च करण्यात आला. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमालीची वाढली हे विशेष. असा उपक्रम राबविणारी ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली आहे. साडेतीन महिन्यांपूर्वी महापालिकेत प्रशासक म्हणून रुजू झालेल्या जी. श्रीकांत यांनी शिक्षण विभागावर अधिक लक्ष केंद्रित केले होते.
ॲप का करावा लागला?गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे.शहरात महापालिकेच्या ७२ शाळा आहेत.त्यातील पटावरील संख्या ५० ते ६० टक्केच राहत होती.माध्यन्ह भोजनानंतर विद्यार्थी गायब होत असत.
ॲप कसे चालणार?दीड महिन्यांपूर्वी ॲप सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांना देण्यात आलेया ॲपमध्ये प्रत्येक वर्गातील हजर विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती नोंद असेल. सकाळी ८:३० पर्यंत किती विद्यार्थी, शिक्षक गैरहजर हे प्रशासकांना एकदम कळेल.
६३ कोटी खर्च आला ‘फळाला’स्मार्ट सिटी अंतर्गत मनपाच्या ५० शाळा डिजिटल करण्यात आल्या. त्यामुळे शाळांचा ‘लूक’चा डिजिटल झाला. खाजगी शाळांपेक्षाही मनपाच्या शाळा स्वच्छ, सुंदर आणि गुणवत्तापूर्ण दिसू लागल्या. त्यामुळे पालकांचा कलही वाढला. काही शाळांमध्ये ‘ॲडमिशन क्लोज’ असे बोर्ड लावावे लागले.
ॲपवर मिळालेल्या माहितीनंतर पुढे काय?ॲप मदतीने एखादा विद्यार्थी सतत गैरहजर राहत असेल तर शिक्षकांनी त्याचे घर गाठावे, त्याच्या समस्या सोडवून शाळेत आणावे, असा नियमच करण्यात आला. त्यामुळे प्रत्येक शाळेतील गळतीचे प्रमाण ९५ टक्के कमी झाले. दररोज १०० ते ८८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. प्रत्येक शाळेतील माध्यमिकच्या काही विद्यार्थिनी महिन्यातून चार ते पाच दिवस गैरहजर असतात. या गैरहजर विद्यार्थिनी कोणत्या तारखेला गैरहजर असतात याचा अभ्यास करून त्यांचे समुपदेशन घडवून त्यांना लागणारे विविध साहित्य पुरवून शाळेत आणले जाणार असल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.