छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून तब्बल ३२ कोटी रुपये प्राप्त झाले. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २ लाख ३० हजार मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी मोबाइलवर मेसेज गेले. त्यामुळे नागरिकांनी व्याजाची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर भरला. याशिवाय मनपाने राबविलेले सप्त तारांकित धोरणही लोकप्रिय ठरत आहे. मालमत्ता करातून ३० दिवसात २५ कोटी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून ३ कोटी रुपये प्राप्त झाले.
कर निर्धारक व संकलक तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, प्रशासक जी. श्रीकांत यांनी ‘अबकी बार ५०० पार’ घोषणा केली आहे. त्या दृष्टीने एप्रिल महिन्यापासूनच वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. वसुलीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सप्ततारांकित धोरण राबविण्यात येत आहे. यात ऑनलाइन कर भरणे, निवासी मालमत्तेच्या ठिकाणी वृक्षारोपण, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग, सोलारचा वापर, ई-वाहन किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर, मालमत्तेचे सहमालक म्हणून महिलेचे नाव असेल तर त्यांना मालमत्ता करात १० टक्के, ८ टक्के आणि ६ टक्के सवलत दिली जात आहे. सात किंवा पाच स्टार घेणाऱ्या मालमत्ताधारकांना सवलत दिली जाणार आहे.
निवडणुकीमुळे अनेक वॉर्ड कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व्यस्त आहेत. निवडणूक संपल्यावर वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. १ ते ३० एप्रिलपर्यंत मनपाच्या तिजोरीत ३२ कोटी २० लाख ७७ हजार ८५१ रुपये जमा झाले. मालमत्ताधारकांनी कराच्या पोटी २५ कोटी ६५ लाख ७० हजार २०८ रुपयांचा भरणा केला. पाणीपट्टीचे ३ कोटी २५ लाख ८९ हजार ४९५ रुपये वसूल झाले. इतर विभागाच्या कराची वसुली ३ कोटी २९ लाख १८ हजार १४८ रुपये इतकी झाली आहे. मालमत्ता कराची आणि पाणीपट्टीची २९ कोटी रुपयांपर्यंत वसुली होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे उपायुक्त थेटे यांनी सांगितले.