चिमुकल्यांच्या साक्षीवरून संशयी बापाला जन्मठेपेची शिक्षा
By Admin | Published: July 11, 2014 12:54 AM2014-07-11T00:54:47+5:302014-07-11T01:05:01+5:30
औरंगाबाद : पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून जाळून मारणाऱ्या वडिलांना १२ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांच्या मुलाच्या साक्षीमुळे जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली गेली.
औरंगाबाद : पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून जाळून मारणाऱ्या वडिलांना १२ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांच्या मुलाच्या साक्षीमुळे जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली गेली.
जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी. कचरे यांनी हा निकाल दिला. विष्णू आसाराम कानडे हा पत्नी वैशाली (२८, रा. सम्राटनगर, सातारा परिसर) हिच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा. त्यावरून त्यांच्यात वादही होत. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी विष्णू कानडे कामाला जातो असे सांगून घरून निघाला; परंतु कामाला न जाता तो घरी आला. यावेळी त्याने दोन्ही मुलांसमोर वैशालीशी भांडण केले व तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटविले. गंभीर भाजलेल्या वैशालीला विष्णूने घाटी रुग्णालयात दाखल केले.
अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. युसूफ मणियार यांना वैशालीने दिलेल्या जबाबात पतीने रॉकेल टाकून पेटवून दिल्याचे सांगितले.
सातारा पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी तिचा मृत्यूपूर्व जबाब घेतला. त्यातही तिने पतीने रॉकेल टाकून जाळल्याचे सांगितले होते. २३ फेब्रुवारी रोजी उपचार सुरू असताना वैशालीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आरोपी विष्णू कानडेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस निरीक्षक बी.के. कंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.डी. काचेमल यांनी तपास केला होता. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी लोकअभियोक्ता एस.एम. रझवी यांनी दहा साक्षीदार तपासले. त्यात वैशालीचा मुलगा आणि मुलीची, डॉ. मणियार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने विष्णू कानडेला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच भा.दं.वि. कलम ४९८ अ नुसार त्याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाला अॅड. एस.व्ही. पंडित आणि अॅड. एच.व्ही. तुंगार यांनी साहाय्य केले.
चारित्र्याच्या संशयावरून घेतला पत्नीचा बळी
विष्णू आसाराम कानडे हा पत्नी वैशालीच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी विष्णूने विशाल (१०) आणि कल्पना (१२) (दोघांचीही नावे बदलेली) यांच्यासमक्ष वैशालीला जाळले.