औरंगाबाद : बदलती जीवनशैली, व्यसनाधीनता, ताणतणाव यासह अनेक कारणांनी मोठ्या व्यक्तींमध्ये वाढणारे हृदयरोग चिंतादायक ठरत आहेत. असे असताना आता बालकांमध्येही जन्मत: आढळून येणारे हृदयरोगआरोग्य विभागासाठी आव्हान ठरत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून बालकांमधील हृदयरोगाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागातर्फे औरंगाबाद जिल्ह्यातील अंगणवाडी आणि शाळांमध्ये करण्यात आलेल्या तपासणींमध्ये १६ वर्षांपर्यंतच्या तब्बल २०५ बालकांमध्ये हृदयरोगाची लक्षणे आढळली. त्यामुळे या संशयित बालकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयात २१ डिसेंबर रोजी १८५ बालकांची टू डी ईको तपासणी करण्यात आली. यातील तब्बल ६४ बालकांना शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची धक्कादायक बाब समोर आली. या बालकांवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बालकांच्या तपासणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. महेश लड्डा, डॉ. रवींद्र बोर्डे, डॉ. किरण चव्हाण, डॉ. भारती नागरे, डॉ. कैलास ताडीकुं डलवार आदींनी प्रयत्न केले.
हृदयात छिद्र, हृदयाच्या झडपा खराबतपासणी केलेल्या बालकांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांत अडथळा, हृदयात छिद्र, हृदयाच्या झडपा खराब आदी दोष आढळून आले. या दोषांमुळे हृदयाची अकार्यक्षमता वाढते. त्यामुळे श्वसनाचा त्रास, दैनंदिन कामे करण्यास अडथळा अशा अनेक अडचणींना बालकांना तोंड द्यावे लागत आहे.
ही आहेत काही कारणेगर्भावस्थेत संसर्ग, गर्भावस्थेत चुकीची औषधी घेणे, गर्भावस्थेत चुकीचा आहार, आनुवंशिकता यासह अनेक कारणांमुळे बालकांमध्ये हृदयाचे आजार आढळून येत आहेत. हे आजार म्हणजे हृदयाची रचना बिघडत आहे. त्यासाठी बदलती जीवनशैली हेदेखील कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
हृदयाच्या झडपा खराबनवजात बालकांमध्ये अनेकदा जन्मजात हृदयाचे आजार असतात. अनेक बालकांच्या हृदयांमध्ये छिद्र असतात, तर संधिवातामुळे मुलांच्या हृदयाच्या झडपा खराब होतात. असे असले तरीही बालकांमध्ये हृदयाच्या आजाराचे प्रमाण अत्यंत कमी आहे.- डॉ. अजित भागवत, हृदयरोगतज्ज्ञ
हृदयाची ठेवण बिघडलेलीमोठ्या व्यक्तींमध्ये आढळणारे हृदयरोग वेगळे असतात. बालकांमध्ये जन्मत: हृदयाची ठेवण, रचना बिघडलेली असते. आता आरोग्य सुविधांमुळे हे समोर येत आहे. गर्भावस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेता कामा नये.- डॉ. विलास मगरकर, हृदयरोगतज्ज्ञ
लवकरच शस्त्रक्रिया होणारराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी आणि शाळांमध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत काही बालकांमध्ये हृदयरोगाची लक्षणे दिसली. त्यांची तपासणी केली असताना काहींमध्ये जन्मजात दोष आढळून आला. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. - डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
या होणार शस्त्रक्रिया- डिव्हाईस क्लोजर ३८- ओपन हार्ट सर्जरी १८ - कार्डियाक कॅथेटरायजेशन ०२ - इतर हृदय शस्त्रक्रिया ०६ एकूण ६४