Children's Day Special 2018 : भिंदोनच्या शाळेतील बाल कवींनी प्रकाशित केले ६० कवितांचे ‘दप्तरातील स्पंदन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 08:37 PM2018-11-14T20:37:00+5:302018-11-14T20:41:32+5:30
महाकवी, निसर्गकवी, विद्रोही कवी, कविवर्य अशी मोठमोठी विशेषणे आपण ऐकत आलो आहोत. मात्र, ‘दप्तरातील कवी’ हे विशेषण आपण कधीच ऐकले नसेल.
- राम शिनगारे
औरंगाबाद : कवी आणि कविता म्हटलं की, एखाद्याचे मोठे नाव पटकन आपल्या डोळ्यासमोर येते. पृथ्वीसह आसमंत व्यापून टाकणारी त्याची शब्दरचना आपल्याला ठाऊक आहे. महाकवी, निसर्गकवी, विद्रोही कवी, कविवर्य अशी मोठमोठी विशेषणे आपण ऐकत आलो आहोत. मात्र, ‘दप्तरातील कवी’ हे विशेषण आपण कधीच ऐकले नसेल. औरंगाबादजवळच्या भिंदोन शाळेत मात्र दप्तरातील कवी आहेत. हो हो.. दप्तरातील कवी.
डोंगरात वसलेल्या भिंदोन या छोटेखानी वस्तीच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हे दप्तरातील कवी आहेत. हे कवी म्हणजे शाळेचे अनेक विद्यार्थीच आहेत. अगदी चौथीच्या वर्गापासून ते सातवीपर्यंतचे अनेक विद्यार्थी इथे कवी आहेत. विद्यार्थ्यांच्या या कवितांचा संग्रह नुकताच ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालाय. ‘दप्तरातील स्पंदन’ असे या कवितासंग्रहाचे नाव. विद्यार्थ्यांच्या ६० कविता ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम शाळेतील प्रयोगशील शिक्षकांनी केला.
शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर भिंदोन हे गाव आहे. या गावात असलेल्या जि.प.च्या शाळेतील चौथी, पाचवी, सहावी, सातवीतील विद्यार्थी कविता, कथा, नाटकांची रचना करतात. या शाळेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या शेकडो कवितांपैकी काही कवितांची निवड करत ‘दप्तरातील स्पंदन’ हा छोटेखानी कवितासंग्रह शाळेतील शिक्षकांच्या प्रेरणेतून तयार केला. या कवितासंग्रहाचे नुकतेच प.सं. सदस्य अनुराग शिंदे, संभाजी शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या बालकवीच्या जाणिवांचा विस्तार व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. ज्याप्रमाणे मातीशी ओलेपण जपणं पाण्याला सांगावं लागत नाही. त्याचप्रमाणे कविमनाचे शिक्षक असतील, तर स्वत:कडील गुण इतरांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो.
यातून शाळेतील शिक्षिका मीनाक्षी राऊत यांनी विद्यार्थ्यांना कवितांच्या रचना करण्यास प्रोत्साहन दिले. यातून विद्यार्थी कवितांच्या निर्मितीसाठी विचार करू लागले. मानवी जीवनातील संवेदनांच्या बिजारोपणास सुरुवात झाली. विज्ञानाच्या तंत्रासोबतच जगण्याचे मंत्रही आत्मसात करण्याची प्रेरणा यातून विद्यार्थ्यांना मिळत गेली असल्याचे मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा सामाजिक, भावनिक, मानसिक विकास व्हावा, आपल्या भावना शब्दात व्यक्त करण्याची संधी मुलांना मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र, विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असलेल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ज्येष्ठ कवींना लाजवेल, अशा प्रकारच्या कवितांची रचना केली असल्याचेही राऊत म्हणाल्या. शाळेतील सहकारी शिक्षक कैलास गायकवाड, अरुणा ठाकुर, प्रतापसिंग जारवाल, रियाज मोहंमद शेख, संजय निकम, रेखा जारवाल, सुलभा मुळे, शिरोडकर, पल्लवी गजेवार, गणेश नलावडे आदींचे सहकार्य लाभले.
२५ मुले कविता करतात
भिंदोनच्या शाळेतील २५ मुले कविता करतात. याशिवाय कथा, नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची संहिता तयार करतात, सामाजिक विषयांवरही लेखन करतात. विद्यार्थी जेव्हा लिहून दाखवतात. तेव्हा त्यातील चुका विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या जातात, असेही मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. प्रकाशित झालेल्या ग्रंथात वैशाली काकासाहेब क्षीरसागर (सातवी), शिवकन्या बद्रिनाथ शिंदे (सातवी), प्राजक्ता पांडुरंग पटेकर (सातवी), ऋतुजा राधाकिसन धोत्रे (सहावी), परवेज मुसा शेख (सातवी), महेश भानुदास शिंदे (सातवी), साईराम दिलीप शिंदे (सहावी), आदित्य बाबू आगळे (सहावी), आरती वैजनाथ शिंदे (सातवी) यांच्या कविता आहेत.