औरंगाबाद : अवघ्या एक दिवसाची चिमुकली, अन्ननलिकाच नसल्याने जन्मानंतर मातेचे दूध पिणेही अशक्य, त्यामुळे कोणत्याही क्षणी जिवावर बेतण्याचा धोका. ही सगळी परिस्थिती ऐकून पहिलेच अपत्य असलेल्या शेतकरी पित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र, घाटीतील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि एक दिवसाची कळी ही आज फुलली आहे.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते. ‘मुले म्हणजे देवा घरची फुले’ असे नेहमी म्हणत असत. जेव्हा एखादी स्त्री आई बनते, तेव्हा तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबियांना होणारा आनंदच वेगळा असतो. घरात एक नवीन पाहुणा येणार म्हणून प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. देवडे हादगाव (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील शेतकरी मधुकर देवडे आणि अश्विनी देवडे यांच्या आयुष्यातही वर्षभरापूर्वी हा आनंद फुलला. मात्र, त्यांच्या एक दिवसाच्या मुलीला छातीत अन्ननलिकाच नसल्याचे निदान झाले आणि सर्वांना मोठा धक्का बसला. अन्ननलिकेअभावी मुलीच्या तोंडातील लाळही बाहेर पडत होती. अशा परिस्थितीत मातेचे दूध पिणेही अशक्य होते.
अवघ्या एक दिवसाच्या मुलीवर शस्त्रक्रिया करणे, हे डॉक्टरांसाठी मोठे आव्हान होते. शिवाय खाजगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यासाठी दीड लाखांवर खर्च सांगण्यात आला. एकीकडे लवकरात लवकर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते, तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रियेचा खर्च पेलणे मधुकर देवडे यांना अशक्य होते. त्यामुळे पहिलेच मूल गमावतो की काय, या भीतीने संपूर्ण कुटुंब हताश झाले होते.
घाटी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया शक्य होईल, अशी माहिती मिळाली आणि या कुटुंबाला एक आशेचा किरण सापडला. क्षणाचाही विलंब न करता मुलीला घाटीत दाखल करण्यात आले. या ठिकाणी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, सर्जरी विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बालशल्यचिकित्सक डॉ. अर्जुन पवार आणि त्यांच्या पथकाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेत या चिमुकलीच्या शरीरात अन्ननलिका तयार करण्यात आली. शस्त्रक्रियेला वर्ष उलटले आहे. एका दिवसाच्या बालिके चे नाव आता ‘स्वरा’ असे आहे. घाटीतील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळेच आमची मुलगी सुखरूप असल्याचे मधुकर देवडे म्हणाले. सहयोगी प्राध्यापक डॉ. मोहंमद अन्सारी, डॉ. आनंद भुक्तर, डॉ. सुशील जमधाडे, डॉ. अभिषेक पोटणीस यांच्यासह कर्मचारी बालकांच्या विविध शस्त्रक्रियांसाठी परिश्रम घेतात.
आव्हान यशस्वी पेललेएक दिवसाच्या बालिकेवर शस्त्रक्रिया क रणे आमच्यासाठी मोठे आव्हान होते. घाटीतील वरिष्ठ आणि सहकाऱ्यांमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. वर्षभरापूर्वी आयुष्य धोक्यात असलेली बालिका आज सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगत आहे.-डॉ. अर्जुन पवार, बालशल्यचिकित्सक, घाटी