औरंगाबाद: शहराला मे अखेरपर्यंत ७४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सुरक्षा कवच प्राप्त होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कमांड ॲण्ड कंट्रोल कक्षाचे लोकार्पण शनिवारी (दि.१६) पोलीस कॉंस्टेबल दत्ता घुले यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
औद्योगिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहर सामाजिक, राजकीय चळवळीचे केंद्र आहे. सुरक्षित शहर म्हणून औरंगाबादची ओळख निर्माण करण्यासाठी शनिवारी एक पाऊल पडले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहराला सुरक्षा कवच देणाऱ्या ७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रण कक्षाचा लोकार्पण सोहळा पोलीस आयुक्तालयात पार पडला. मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित पोलीस कॉन्स्टेबल दत्ता घुले (मंत्री भूमरे याचे अंगरक्षक) यांना कंट्रोल रूमची फीत कापण्याचा मान देत उद्घाटन केले, शिवाय कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रण कक्षाची मान्यवरांनी पाहणी केली. सोबत तेथील 'वॉर रूम'मध्ये बसून पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता आणि मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्याकडून या प्रकल्पाची माहिती घेतली.
=====================
चौकट
कंट्रोल रूम पाहून मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, ‘अरे वा, छान काम झाले...’
सीसीटीव्ही कमांड आणि कंट्रोल रूममध्ये पाय ठेवताच, समोर प्रत्येक संगणकासमोर बसलेले पोलीस कर्मचारी आणि भिंतीवर लावलेल्या स्क्रीनवर शहराच्या विविध चौकांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरू असलेले चित्रण पाहून मंत्री ठाकरे यांनी, ‘अरे वा, छान काम झाले,’ असे उद्गार काढले.
========================
शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नव्याने ७०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. यापैकी ५० कॅमेरे कार्यांन्वित झाले आहेत. आणखी १६० कॅमेरे १५ दिवसांत सुरू होईल.
==========================
१७८ कोटी रुपयांचा प्रकल्प
शहरातील प्रत्येक चौक, लहान-मोठे प्रमुख रस्ते, महत्त्वाची ठिकाणे, संवेदनशील असे मंदिर, मशीद, चर्च, थोरांचे पुतळे, सर्व वाहतूक सिग्नल चौक, शहराच्या प्रवेश नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलीस नजर ठेवतील.
साधे सीसीटीव्ही कॅमेरे -६००
पीटीझेड कॅमेरे - १००
अशा एकून ७४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कमांड आणि कंट्रोल रूम
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात १७८ कोटी रुपये खर्च
====================
तीन शिफ्टमध्ये ७० कर्मचाऱ्यांची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर नजर
७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ७० पोलीस कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कमांड आणि कंट्रोल कक्षात बसून, प्रत्येक चौकातील घडामोडीवर नजर ठेवणार आहे. या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले, शिवाय पोलीस नियंत्रण कक्षाचे प्रमुख त्यांचे प्रमुख असतील. पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांना ते थेट रिपोर्टिंग करतील.