औरंगाबाद : कचऱ्यावर प्रक्रिया करणारे केंद्र उभे नसतानाही महापालिकेने खाजगी कंपनीमार्फत किमान ३ झोनमध्ये कचरा उचलण्यासाठी २० डिसेंबरचा मुहूर्त काढला होता. कंपनीकडून तयारीच झाली नसल्याने आता ५ जानेवारीपासून संपूर्ण शहरात एकाचवेळी खाजगी कंपनीचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कचरा जमा करण्यासाठी इंदूर पॅटर्ननुसार रिक्षा तयार करण्यात येत आहेत. २३ डिसेंबरला या रिक्षा शहरात दाखल होणार आहेत.
शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याचे काम महापालिकेने बंगळुरू येथील खाजगी कंपनीला दिले आहे. तीन महिन्यांपूर्वी मनपाने या कंपनीच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे. डिसेंबर महिन्यात कंपनीने काम सुरू करावे, असे मनपाने आदेशित केले होते. कंपनीला स्थानिक पाठबळ अजिबात मिळाले नाही. शहरातील कचरा उचलण्याच्या कामाचे अत्यंत बारकाईने कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक वॉर्डात किती रिक्षा लागतील, मोठी वाहने किती लागणार, याचा हिशेब करण्यात आला. इंदूरप्रमाणे अद्ययावत रिक्षा तयार करण्यात येत आहेत. ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्याची सोय रिक्षात आहे. सॅनेटरी नॅपकीनसाठी स्वतंत्र बीन देण्यात येणार आहे. या रिक्षावर चालक, एक कर्मचारी आणि एका खाजगी एनजीओचा कर्मचारी देखरेखीसाठी ठेवण्यात येणार आहे.
प्रत्येक घरातून १०० टक्के या कंपनीने कचरा जमा केलाच पाहिजे, असे मनपाने बजावले आहे. ५ जानेवारीपासून शहरातील ११५ वॉर्डांमध्ये कंपनी एकाचवेळी काम सुरू करणार आहे. २३ डिसेंबर रोजी २५ ते ३० रिक्षा शहरात पाहणीसाठी दाखल होणार आहेत. यासोबत काही मोठी वाहनेही असतील. कंपनीने स्वत:च्या मालकीची नवीन वाहने आणावीत, अशी अट करारात आहे.
एक टन कचऱ्यासाठी १८६३ रुपयेकंपनीने एक टन कचरा उचलला किंवा जमा केल्यास मनपा १८६३ रुपये देणार आहे. दररोज मनपाला कचरा उचलण्यासाठी कंपनीला किमान ८ लाख ३८ हजार रुपये द्यावे लागतील. महिना २ कोटी ५१ लाख, तर वर्षाला ३० कोटी रुपये खर्च द्यावा लागेल. ७ वर्षांसाठी मनपाने कंपनीसोबत करार केला आहे. मनपा सर्वसामान्य नागरिकांकडून दररोज १ रुपया, व्यापाऱ्यांकडून २ रुपये जमा करणार आहे. ही रक्कम नेमकी कोण वसूल करणार, हे अद्याप निश्चित नाही.