नागरी वसाहतीतील गोदामांमुळे अपघाताचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 08:36 PM2019-06-22T20:36:04+5:302019-06-22T20:36:14+5:30
साहित्याची वाहतूक करणाऱ्या या जडवाहनाच्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे
वाळूज महानगर : बजाजनगरात विविध व्यवसायिकांनी नागरी वसाहतीत गोदामे सुरु केली आहेत. साहित्याची वाहतूक करणाऱ्या या जडवाहनाच्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच परिसरातील नागरिक व वाहनधारकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठी कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणा-या बजाजनगरात जवळपास एक हजार सोसायट्या आहेत. यात लाखावर नागरिक कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वाळूज औद्योगिक परिसरात कंपन्याला लागणारा कच्चा माल तसेच तयार माल ठेवण्यासाठी अनेक व्यवसायिकांनी बजाजनगरात गोदामे केली आहेत. याच बरोबर किराणा, मॉल व इतर मोठ्या व्यवसायिकांनी नागरी वसाहतीत भूखंड खरेदी करुन किंवा भाड्याने घेऊन गोदामे सुरु केली आहेत.
या गोदामात मालाची ने-आण करणा-या जडवाहनांची रात्रंदिवस वर्दळ असते. विशेष म्हणजे इंद्रप्रस्थ कॉलनी, आंबेडकर चौक, महाराणा प्रताप चौक, कामगार कल्याण भवन, मोरे चौक, जयभवानी चौक आदी नागरी वसाहतीत अनेकांनी गोदामे सुरु केली आहेत. या गोदामात कंटेनर, ट्रक, टेम्पो, लोडिंग रिक्षा आदी वाहनांतून मालाची ने-आण करण्यात येते.
मालाची ने-आण करणारी वाहने रस्त्यावर तासन्तास उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. रात्रीच्या जडवाहने उभी करणारे वाहनचालक मद्य प्राशन करुन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याने बजाजनगरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. एमआयडीसीसह पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. रहदारीस अडथळा ठरणारी नागरी वसाहतीतील गोदामे औद्योगिक परिसरात स्थालांतरित करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.
अपघाताचा धोका वाढला
रस्त्यालगत उभा राहणा-या या अवजड वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. या अनधिकृत गोदामाकडे एमआयडीसी प्रशासनही डोळेझाक करीत असल्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. वाहतुकीची कोंडी करणाºया जडवाहनधारकाविरुध्द वाहतुक शाखेचे अधिकारी व कर्मचारीही कारवाई करण्यास धजावत नसल्यामुळे नागरिकात नाराजीचा सूर उमटत आहे.