औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या जमिनींचे घोटाळे राज्यभर गाजत आहेत. त्यातच बोर्डाचे सीईओ अनिस शेख यांनी महसूल विभागावर मोठा लेटर बॉम्ब टाकला. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या हद्दीमध्ये भूमाफिया सैराट झालेे आहेत. वक्फ बोर्डाच्या मालमत्ता हडपण्याचा उद्योग सुरू आहे. आपल्या विभागाचे कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याला आवर घालण्यासाठी आपण जातीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
वक्फ बोर्डाचे सीईओ अनिस शेख यांनी महसूल विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र शासनाने वक्फ ॲक्टमध्ये १९९५ मध्ये सुधारणा केली. १ जानेवारी १९९६ पासून नवीन अधिनियम लागूही झाले. कायद्यातील सुधारणा ही खूप फायदेशीर आहे. त्याची प्रखरपणे अंमलबजावणी होत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. कायद्यातील कलम १०८-अ मधील तरतुदीनुसार जुनी प्रकरणे आपोआप बाद होतात. कलम ५१-१अ मध्ये वक्फच्या परवानगीशिवाय कोणालाही मालमत्तेवर हक्क सांगता येत नाही. मशीद, दर्गा, खानखा, कब्रस्तान आणि इमामबाडा याला अपवाद आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वक्फच्या जमिनी हडपण्याचे काम सुरू आहे. भूमाफिया या कामांसाठी मोठ्या प्रमाणात सरसावल्याचे दिसून येते. बोगस कागदपत्रांच्या आधारावर ही कामे सुरू आहेत.
महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. सीईओंनी उदाहरण देताना बीड येथील एका जमिनीचा संदर्भ दिला. यामध्ये त्यांनी म्हटले की, वक्फच्या जमिनी परस्पर वेगळ्या दाखविण्यात आल्या. त्यामुळे आम्हाला कारण नसताना खंडपीठात जावे लागले. दुय्यम निबंधकांनाही आम्ही वक्फशी संबंधित दस्तची नोंदणी करू नये, असे कळविणार आहोत. आपण या सर्व प्रकरणांमध्ये लक्ष घालावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.