कॉलेज, विद्यापीठांच्या तासिका १ ऑक्टोबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:05 AM2021-07-28T04:05:17+5:302021-07-28T04:05:17+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत नवीन शैक्षणिक वेळापत्रकावर मंगळवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. ३० ऑगस्टपासून ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत नवीन शैक्षणिक वेळापत्रकावर मंगळवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. ३० ऑगस्टपासून नवीन सत्र सुरू होणार असून, १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष तासिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असले तरी विद्यापीठ व महाविद्यालयीन तासिका ऑनलाइन की ऑफलाइन घ्यायच्या, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ नाट्यगृहात विद्या परिषदेची बैठक झाली. या बैठकीच्या सुरुवातीला कुलगरू डॉ. येवले म्हणाले, ‘कोविड’नंतरची बदलेली परिस्थिती लक्षात घेता अभ्यासक्रम ते ऑनलाइन परीक्षा, असे अनेक निर्णय घ्यावे लागले. आगामी काळातही विद्यार्थी केंद्रबिंदू माणूसच अभ्यासक्रम, तासिका व परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. यावेळी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह ४५ सदस्य बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत एकूण ३४ विषयांवर चर्चा झाली व निर्णय घेण्यात आले.
आजच्या बैठकीत संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवीस्तरावर ‘भारतीय संविधान’ हा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला असून, याची सुरुवात नवीन शैक्षणिक वर्षापासून करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय एम.एस्सी वनस्पतीशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांच्या सुधारित अभ्यासक्रमांना मंजुरी, परीक्षा व प्रात्यक्षिक विषयक नवीन मार्गदर्शक सूचना लागू करण्यास मंजुरी, ‘बीसीएम’च्या चॉइस बेस्ड, क्रेडिट व ग्रेडिंग सिस्टीम’ला मंजुरी, ‘एम.फिल, पीएच.डी.’ अभ्यासक्रमाकरिता सुधारित नियमावलींना मंजुरी, नवीन महाविद्यालये व विस्तारीकरणांतर्गत मान्यता प्राप्त अभ्याक्रमांना प्रथम संलग्निकरण देण्यासंदर्भात डॉ. विलास खंदारे समितीच्या शिफारशींना मान्यता, बीसीएम, बी-व्होक सेंद्रिय शेती, शारीरिक शिक्षण व क्रीडा बँकिंग अभ्यासक्रमास मान्यता, औरंगाबादेतील मौलाना आझाद शिक्षण संस्था संचलित मिलेनियम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे शिकविले जाणारे एम.बी.ए., एमसीए अभ्यासक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चौकट...................
यापुढे १ टक्का ग्रेस मार्क देणार
यापुढे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १ टक्का ग्रेस मार्क देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सन २०१६ विद्यापीठ कायद्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने क्रेडिट बेस्ड चॉइस पद्धत अंगिकारली. त्यामुळे सन २०१८ पासून ग्रेस मार्क देण्याची पद्धत बंद करण्यात आली होती. आता सर्वच विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेपासून उत्तीर्ण होण्यासाठी लागणारा १ टक्का ग्रेस मार्क दिला जाणार आहे.