लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सोनी कंपनीच्या एलईडी टीव्हीत बिघाड झाल्याने सदर कंपनीने तो बदलून नवीन द्यावा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने ३१ आॅगस्ट रोजी दिला. तसेच श्रीलंका सहलसाठी रक्कम भरूनही पती-पत्नीस टुरला नेलेच नसल्यामुळे सदर रक्कम परत कण्याचे न्यायमंचने २९ आॅगस्टला आदेशित केले.औंढानागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील डॉ. जगन्नाथ मारोतराव आगाशे यांनी १ जानेवारी २०१६ रोजी प्रो. प्रा. गुरूदेव एंन्टरप्रायजेसकडून ९० हजार रूपये किंमतीचा एलईडी टीव्ही प्रवीण रूस्तुमराव अंभोरे यांच्याकडून खरेदी केला होता. परंतु डॉ. आगाशे यांनी टीव्ही खरेदी करून सहा महिनेही उलटले नाही, त्यात बिघाड झाला. वारंटी कार्ड असूनही टीव्ही बदलून दिला जात नव्हता. तसेच टीव्ही दुरूस्तीसाठी ३६ हजार ६९१ रूपये अर्जदरास भरण्यास सांगण्यात आले. डॉ. आगाशे यांनी टीव्ही योग्य हाताळली नसल्यानेच त्यात बिघाड झाल्याचे गैरअर्जदाराचे म्हणणे होते. वारंटी कालावधीत टीव्ही बदलून देण्याची अर्जदाराने विंनती केली. परंतु याकडे गुरूदेव इंटरप्रायजेस व सोनी कंपनीचे शाखा व्यवस्थापक या दोघांनीही दुर्लक्ष केले. सदर वस्तू वारंटीमध्ये असतानाही दुरूस्तीचा खर्च मागितल्याने ग्राहकाची फसवणूक झाल्याचे मंचने स्पष्ट केले. त्यामुळे अर्जदार डॉ. आगशे यांना सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही तितक्याच किमतीत नवीन व चांगल्या स्थितीत द्यावा, तसेच मानसिक त्रासापोटी दोन हजार व दाव्याचा १ हजार रुपये खर्च निकालापासून तीस दिवसांत देण्याचे आदेश अध्यक्षा ए. जी. सातपुते यांनी दिला.३० सप्टेंबर २०१६ रोजी सदर प्रकरणाबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचकडे तक्रार दाखल झाली. ३१ आॅगस्ट २०१७ रोजी न्याय मंचने नुकसान भरपाईचे आदेश दिले.
ग्राहक मंचचा भरपाईचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:15 AM