शेंद्रा : शेंद्रा एमआयडीसीतील साई इंटरप्राइजेस कंपनीच्या गोदामाला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या ५ बंबांच्या साह्याने रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेत सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.
साई इंटरप्राइजेस या कंपनीचे शेंद्रा एमआयडीसीत गोदाम आहे. परिसरातील जवळपास २ हेक्टरवर लाकडाचा साठा ठेवण्यात आलेला आहे. या लाकाडाच्या साठ्याला सोमवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. उण व जोरदार वारे वाहू लागल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केले. शेंद्रा एमआयडीसीतील अग्निशामक दलाच्या ३ बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तेही अपुरे पडल्याने वाळूजच्या अग्निशामक दलाचे २ बंब मागविण्यात आले. या बांबला ५ ते ६ टँकरने पाणी पुरवठा सुरू होतो.
रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरुच होते. गोदामाच्या तिनही बाजूने झाडी व नंतर रोड असल्याने सुदैवाने इतर कुठल्याही कंपनीला आगीची झळ बसली नाही. तसेच सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून, यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.