कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पालोदकर सिल्लोडमध्ये सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:54 AM2019-06-06T11:54:33+5:302019-06-06T11:57:12+5:30
सत्तारांच्या बंडामुळे काँग्रेसच्या रिक्त झालेल्या जागेवर कब्जा मिळविण्याचा पालोदकरांचा प्रयत्न
सिल्लोड (औरंगाबाद ) : माजी जि.प. अध्यक्ष प्रभाकर पालोदकर सिल्लोड -सोयगाव विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. औरंगाबादेत चिकलठाणा विमानतळावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची मंगळवारी त्यांनी भेट घेतली. या भेटीमुळे तालुक्यात वातावरण तापले असून नव्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.
या मतदारसंघाचे विद्यमान आ. अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने तालुक्यात राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. स्थानिक भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सिल्लोडमध्ये बैठक घेऊन सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध दर्शविला होता. सत्तारांच्या बंडामुळे आता काँग्रेसच्या रिक्त झालेल्या जागेवर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न पालोदकर यांनी सुरू केल्याचे दिसते आहे.
सिल्लोडमध्ये काँग्रेसला आता पालोदकर हेच तारू शकतात, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी पक्षश्रेष्ठीला सांगितले. त्यानंतर पालोदकर व चव्हाण यांची औरंगाबादेत भेट होऊन चर्चाही झाली. या चर्चेतील मुद्दे अद्याप समोर आलेले नाहीत; परंतु या घडामोडीनंतर सिल्लोडमधून पालोदकर हे काँग्रेसतर्फे आगामी विधानसभा निवडणूक लढणार, या विषयावर सध्या तालुक्यात चर्चा सुरू आहे. पालोदकरांमुळे राजकारणाला कलाटणी मिळेल.