- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : सततच्या अपयशामुळे काँग्रेस (Congres ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) औरंगाबाद जिल्ह्यात आगामी सर्वच निवडणुकांच्या (Aurangabad Municipal Corporation ) पार्श्वभूमीवर बॅकफूटवरच असल्याचे जाणवत आहे. पक्ष म्हटल्यानंतर निवडणुकांना सामोरे जाणे आलेच, परंतु एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा भाजप (BJP ) आणि शिवसेनेचा ( Shiv Sena ) बालेकिल्ला बनला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना औरंगाबाद जिल्ह्याबद्दल फारशी आशाच राहिलेली नाही. आहे ती परिस्थिती सुधारली तरी खूप झाले, अशी मानसिकता दिसून येते. त्यामुळेच दोन्ही पक्षांनी नेमून दिलेले संपर्कमंत्री इकडे कित्येक महिने फिरकत नाहीत.
नानांमुळे चैतन्यकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेस मरगळ झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु नाना पटोले यांच्या वेगाने स्थानिक पदाधिकारी मेहनत करताना दिसत नाहीत. शिवाय, नानाभाऊंना काँग्रेसच्याच मंत्र्यांची साथ दिसत नाही, हे आता जाणवायला लागले आहे. प्रख्यात बुद्ध-भीम गायिका कडूबाई खरात यांना काँग्रेसने घर देण्याच्या कार्यक्रमाचा चांगला इव्हेंट केला. या घरभरणीनिमित्त शहरभरातून चांगली गर्दी झाली. एक चांगला मेसेज गेला. नाना पटोले यांच्या कामाची शैलीच न्यारी. ते चहापाण्यानिमित्त दोन-चार कार्यकर्त्यांच्या घरी जातातच. त्यातून एक माहोल बनविण्यात ते यशस्वी होत आहेत. त्यांच्या या जनसंपर्काचा काँग्रेसला मनपाच्या आगामी निवडणुकीत फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
बाकी आनंदीआनंद...नाना पटोले वजा केले तर औरंगाबादेत काँग्रेसची अजिबात उल्लेखनीय कामगिरी नाही, वाॅर्ड अध्यक्ष, बूथ कमिट्यांचा पत्ता नाही. गांधी भवनातील कार्यक्रमांना हजेरी लावणे, स्टेज तुटेपर्यंत गर्दी करणे, खुर्चीसाठी भांडणे याच बाबी ठळकपणे घडतात आणि लक्षात राहतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉरर्मन्सही फार उल्लेखनीय नाही. या दोन्ही पक्षांचे जिल्ह्यात आमदार खासदार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही बोटावर मोजता येतील एवढेच प्रतिनिधी आहेत.
भुजबळांमुळे ओबीसी आकर्षितशरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील आले तरच त्यांच्या अवतीभवती गर्दी होते. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ नुकतेच औरंगाबादला येऊन गेले. त्यांचे कट्टर समर्थक मनोज घोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती करून ओबीसींना आकर्षित करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. इकडे पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात वक्ता सेलच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. हल्ली राजकीय पक्षांना प्रशिक्षणाचे वावडे असताना राष्ट्रवादीचा हा प्रयत्न स्तुत्यच म्हटला पाहिजे.