कारखान्यांची सीईटीपी प्रकल्पात जोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 07:16 PM2019-04-07T19:16:58+5:302019-04-07T19:17:27+5:30
काही कंपन्या रसायनमिश्रीत सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याने अनेक सेक्टरमधील गटारी तुंबल्या आहेत.
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील १३४ कारखान्यांनी सीईटीपी प्रकल्पात जोडणी केलेली असून, ६० कंपन्या टँकरद्वारे या प्रकल्पात पाणी साणून सोडतात. मात्र, काही कंपन्या रसायनमिश्रीत सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याने अनेक सेक्टरमधील गटारी तुंबल्या आहेत. औद्योगिक वसाहतीतील विविध सेक्टरमध्ये हे चित्र पहावयास मिळते.
वाळूज उद्योनगरीत जवळपास ३ हजार लहान मोठे कारखाने आहेत. पूर्वी बहुतांश कंपन्या सांडपाण्याची नाल्यात वा उघड्यावर विल्हेवाट लावत होत्या. पावसाच्या पाण्याबरोबर काही कंपन्या सांडपाणी कंपन्यातून बाहेर सोडत असल्याच्या तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांतून केल्या जात होत्या. परिसरातील जलसाठे दूषित झाले आहेत. रसायनयुक्त सांडपाणी जमिनीत पाझरुन विहिरी व हातपंपाचे पाणीही दूषित झाले आहे. याबाबतच्या तक्रारी वाढल्याने एमआयडीसीकडून या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. दशकापूर्वी वाळूज उद्योगनगरीत बीओटी तत्वावर १० एमएलडी क्षमतेचा सीईटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे.
या प्रकल्पात सांडपाणी सोडण्यासाठी पाईपलाईनही टाकलेली आहे. मात्र, सीईटीपी प्रकल्पात जोडणीचा खर्च वाचविण्यासाठी काही कारखानदार छुप्या पद्धतीने सांडपाण्याची उघड्यावर विल्हेवाट लावत असल्याचे प्रकार पुन्हा वाढले आहे.
दोन महिन्यांपासून वाळूजमहानगर परिसरातील घाणेगाव, करोडी, शरणापूर आदी ठिकाणी टँकरद्वारे रसायनयुक्त सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे जमिनी नापीक होण्याचा धोका वाढल्याने तसेच मुक्या जनावरांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी नागरिक व शेतकऱ्यांची प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केल्या आहेत. विशेष म्हणजे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करुन पाण्याचे नमुने घेतले आहेत. मात्र प्रयोग शाळेचा अहवाल उघड केला जात नसल्याने या परिसरातील नागरिकात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.