औरंगाबाद : शहरातील घराच्या बांधकामांची गती पुन्हा एकदा वाढली आहे. नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या विविध गृहप्रकल्पात सध्या ३ हजारांपेक्षा अधिक फ्लॅट उभारले जात आहेत. कोरोनामुळे लोकांना वर्क ऑफ होम करावे लागत असल्याने, मोठ्या फ्लॅटची मागणी वाढली आहे. यात थ्री ते फाइव्ह बीएचके फ्लॅटचा समावेश आहे. बांधकाम जोरात सुरू असल्याने, रियल इस्टेटमध्ये सकारात्मक वातावरण पसरले आहे.
गृह प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी गतवर्षी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सूट दिली. त्यांचा फायदा घेत, शहरातील लोकांनी घरे खरेदी केले होते. सप्टेंबर, २०२० ते मार्च, २०२१ दरम्यान जिल्ह्यात ७० हजार ७५६ घरांची विक्री झाली. हा एक विक्रमच ठरला होता.
सध्या अनलॉक असले, तरी शहरातही वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पुण्यात आयटी क्षेत्रात काम करणारे औरंगाबादेतील युवक मागील वर्षभरापासून शहरात आपल्या घरातूनच ऑनलाइन काम करत आहेत. अशा युवकांकडून मोठ्या घरांची मागणी वाढली आहे. यामुळेच सध्या उभारत असलेल्या ३ हजार फ्लॅट मध्ये २५ टक्के फ्लॅट हे थ्री, फोर, फाइव्ह बीएचके आहेत. त्यात रोहाउस, बंगल्यांचाही समावेश आहे, तर जे भाड्याने राहतात, ते आता स्वत:चे घर खरेदी करत असल्याने बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
---
प्रतिक्रिया
मागील वर्षीपेक्षा २५ टक्क्यांने वाढले गृहप्रकल्प
जानेवारी ते जुलै, २०२० दरम्यान शहरात विविध प्रकल्पात २२५० फ्लॅट, रोहाऊस ते शॉपपर्यंतचे बांधकाम करण्यात आले. यंदा याच काळात बांधकामाचा आकडा ३,००० पर्यंत पोहोचला आहे. २५ टक्क्यांनी बांधकाम साइड वाढल्या आहेत. घरांची बुकिंग सुरू झाली आहे. गणेशोत्सव ते दिवाळीच्या काळात ग्राहक मोठ्या प्रमाणात घरांची बुकिंग लोक करतील व याच काळात अनेक ग्राहक स्वत:च्या घरात राहण्यास जातील. ग्राहकांना घरांचा वेळेवर ताबा देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामाचा वेग वाढविला आहे.
नितीन बगडिया, अध्यक्ष, क्रेडाई
--
चौकट
६० टक्के फ्लॅटच्या किमती २५ ते ८० लाख दरम्यान
नव्याने बांधकाम सुरू असलेल्या फ्लॅटमध्ये ६० टक्के
वन, टू व थ्री बीएचके फ्लॅट असून, त्यांचा किमती सरासरी २५ ते ८० लाख दरम्यान आहेत. १५ टक्के फ्लॅट, रोहाउस २५ लाखांपेक्षा कमी किमतीचे तर ७५ लाखांपेक्षा अधिक किमतीचे फ्लॅट, रोहाउस, बंगले यांचा वाटा २५ टक्क्यांपर्यंत आहे.