बांधकाम मजूर, गवंड्यांना सुरक्षा साधने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:48 AM2018-08-23T00:48:40+5:302018-08-23T00:51:13+5:30
बांधकाम मजुरांचे कामावरील अपघात टाळण्यासाठी कामगार मंत्रालयातर्फे मजुरांना सुरक्षा साधने घेण्यासह प्रशिक्षणासाठी देखील निधी दिला जात आहे; परंतु बांधकाम व्यावसायिक मजुरांकडून जोखमीची कामे करून घेणे, तसेच त्यांना सुरक्षितेची साधने न मिळाल्याने अपघाताचे प्रकार घडतात.
साहेबराव हिवराळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बांधकाम मजुरांचे कामावरील अपघात टाळण्यासाठी कामगार मंत्रालयातर्फे मजुरांना सुरक्षा साधने घेण्यासह प्रशिक्षणासाठी देखील निधी दिला जात आहे; परंतु बांधकाम व्यावसायिक मजुरांकडून जोखमीची कामे करून घेणे, तसेच त्यांना सुरक्षितेची साधने न मिळाल्याने अपघाताचे प्रकार घडतात.
यंदा औरंगाबाद विभागात ९ हजार मजुरांची नोंदणी झाली आहे. अभियान राबवून शासन त्यांना ५ हजार रुपये अनुदान सुरक्षा साधने व औजारे घेण्यासाठी देत आहे. तत्पूर्वी गवंडी व मजूर (बिगारी) यांना बांधकामाचे मोजमाप, औजारांची नावे तसेच इतर बारकावे सांगण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. जानेवारी ते आॅगस्टपर्यंत औरंगाबाद शहरातील विविध कॉलनी, वसाहतीत बांधकामावर जाऊन तेथील मजूर व गवंड्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. या बांधकाम मजुरांची कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणी आहे. ज्यांनी प्रशिक्षण घेतलेले नसेल, त्यांनी नोंदणी करून प्रशिक्षण घ्यावे, ठेकेदारांनी ही माहिती दडवून ठेवू नये. सुरक्षेचा भाग म्हणून कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत हा उपक्रम चालविला जात आहे.
...
बांधकाम व्यावसायिकांनी सुरक्षा साधनांचा वापर करूनच कामावर गेले पाहिजे. विमा तसेच औजारांची इतर माहिती मजुरांना होणे गरजेचे आहे. कायद्याची पूर्तता करूनच बांधकाम मजुरांना अनुदान देता येते. तालुकास्तरावर कामगार आयुक्तालयाच्या वतीने अभियान राबवून त्यांना जागृत करण्याचे काम सुरू आहे.
-शैलेंद्र पौळ (कामगार उपायुक्त, औरंगाबाद)
...
जाचक अटींचा कामगारांना त्रास
नोंदणीकृत कामगारांना अनुदानासाठी अनेक चकरा माराव्या लागत आहेत. काही नियम, अटी शिथिल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी कामगारमंत्र्यांकडे केली आहे.
-सलीम शहा (बांधकाम संघटना)
....
प्रशिक्षणातून फायदा
शासनाच्या वतीने मजुराला अनुदान
दिले जाते; परंतु तो मजूर कोठे काम करतो, तेथे प्रत्यक्ष
जाऊन औजारांची माहिती, सुरक्षेचे काही उपाय, वापरायची साधने याचे ज्ञान दिले जाते.
- तुषार वाकेकर