औरंगाबाद : कोरोना काळात घरोघरी जाऊन वीज बिलाची रीडिंग घेण्यात आलेली नाही. मोघम सरासरी अंदाजे रीडिंग टाकून वसुलीचा बडगा उगारला आहे. अवाच्या सव्वा वीजपुरवठा देयकांच्या वसुलीने ग्राहकांना चांगलाच शाॅक दिला आहे.
कोरोना काळात नागरिकांच्या हाताला काम नसल्याने त्या काळातील बिल माफीच्या घोषणा शासनाने केल्या. नंतर यू-टर्न घेत व्याजमाफी आणि आता वसुलीसाठी महावितरण तगादा लावत असल्यामुळे ग्राहकांची भंबेरी उडाली आहे. मध्यंतरी पावसाने वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेकांनी तक्रारी केल्या, तेव्हा कर्मचारी काम करीत आहेत, बिघाड सापडला की, वीज सुरळीत होईल, तुम्ही लाईट बिल भरले का ते दाखवा, त्यानंतरच महावितरणला बोला, असेही अधिकारी व कर्मचारी बोलत असल्याचा अनुभव नागरिकांना आलेला आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे शासनाने सांगितले असले तरी अधिकारी, कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्राहकांची बोळवण करतात. अनेकदा तक्रार करूनही तिचे निरसन करण्यापेक्षा त्याठिकाणी कर्मचारी येऊन गेले, फॉल्ट सापडला नाही, तुम्ही त्याला फोन करा, माझी ड्यूटी संपलेली आहे. मी आताच कामावर आलो. कर्मचारी आले की पाठवतो, या थातुरमातुर उत्तरांनी ग्राहक त्रस्त आहेत.
बिल भरून घेण्यासाठी तगादा
वीजपुरवठ्याचे सरासरी देयक देऊन वसुलीचा तगादा कायम ठेवला आहे. शासनाचे बिल माफीचे अद्याप काही ठरलेले नाही. बिलाची ऑनलाईन तक्रार केल्यानंतर अवघ्या २० व्या मिनिटात तुमची तक्रार निकाली काढल्याचा संदेश आला. त्यामुळे नाइलाजाने पूर्ण बिल भरावे लागले.
-अनंत सोन्नेकर (ग्राहक)
अधिकाऱ्याकडे शिष्टमंडळ दाद मागणार
सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला बगल दिली जाते. वीज बिलातील वसुली व तक्रारीवर जनतेची दिशाभूलच केली जाते. मीटर वापराचेच बिल घ्यावे, इतर भार कशाचा याची दाद मागण्यासाठी वरिष्ठांना शिष्टमंडळ भेटणार आहे.
-महेश चौधरी (ग्राहक)