वाळू उपशासाठी मिळेनात ठेकेदार
By Admin | Published: July 18, 2016 12:39 AM2016-07-18T00:39:43+5:302016-07-18T01:10:13+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यात तीन वाळू ठेक्यांच्या लिलावा संदर्भात होणाऱ्या ठेक्यातून २५ टक्के रक्कम कमी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या गौण खणिज विभागाने आयुक्ताकडे प्रस्ताव पाठविला आहे.
व्यंकटेश वैष्णव , बीड
जिल्ह्यात तीन वाळू ठेक्यांच्या लिलावा संदर्भात होणाऱ्या ठेक्यातून २५ टक्के रक्कम कमी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या गौण खणिज विभागाने आयुक्ताकडे प्रस्ताव पाठविला आहे. तीन महिन्यांत एकही ठेकेदार ठेका भरण्यासाठी पुढे आला नाही.
जिल्ह्यातील तीन वाळू ठेक्यांच्या निविदा तीन महिन्यांपूर्वी काढल्या होत्या. दरम्यानच्या काळात एकही निविदा गौण खणिज विभागाकडे आली नाही. तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील तपे निमगाव, सांडसचिंचोली, पांचाळेश्वर या तीन ठिकाणच्या वाळू पट्ट्याच्या निविदा गौण खणिज विभागाने काढल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १५ वाळू पट्टे आहेत. संयुक्त वाळू पट्ट्यामध्ये गेवराई व माजलगाव तालुक्यात ११ वाळू पट्टे आहेत. तर बीड व औरंगाबाद असा संयुक्तपणे एक वाळू पट्टा आहे. उर्वरित तीन वाळू पट्टे बीड जिल्ह्यामध्ये आहेत. या तीनही वाळू पट्ट्यांचा लिलाव होणार आहे. याबाबत गौण खणिज विभागाने तीन महिन्यांपूर्वी जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे. मात्र वाळू लिलाव परवडत नसल्यामुळे निविदा भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत काही वाळू ठेकेदारांनी खाजगीमध्ये ‘लोकमत’ला सांगितले.
लिलावाच्या २५ टक्के रक्कम कमी केल्यामुळे ठेकेदार निविदा दाखल करतील, असा अंदाज जिल्हा प्रशासनाला असल्याने दोन दिवसांपूर्वी गौण खणिज विभागाने आयुक्तांकडे लिलावाच्या २५ टक्के रक्कम कमी करण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. आता ठेकेदारांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.