कोरोना सेंटरमध्ये रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न करणारा डॉक्टर बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 07:43 PM2021-03-04T19:43:42+5:302021-03-04T19:46:39+5:30
Doctor attempted rape on corona positive patient महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोग्य अधिकारी मनीषा भोंडवे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले.
औरंगाबाद : महापालिकेच्या पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात मंगळवारी मध्यरात्री पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरला गुरुवारी महापालिका प्रशासनाने तडकाफडकी बडतर्फ केले.
महापालिकेच्या पद्मपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी रात्री २ वाजता हा प्रकार घडला होता. बुधवारी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोग्य अधिकारी मनीषा भोंडवे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले. भोंडवे यांनी गुरुवारी सकाळी चौकशी अहवाल प्रशासक यांना सादर केला. अहवालात पदमपुरा येथे आयुष डॉक्टर संदीप पंजरकर हा सीसीटीव्हीत महिलेशी लगट करताना अनेकदा दिसून आला. महिलेने दिलेल्या माहितीवरून आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून चौकशी अधिकारी यांनी डॉक्टर पंजरकर दोषी असल्याचे अहवालात नमूद केले. या अहवालावरून प्रशासक पांडेय यांनी तडकाफडकी डॉक्टर पंजरकरला बडतर्फ केले.
नेमका प्रकार काय झाला
डॉ. सचिन पंजरकर याची गतवर्षी मे महिन्यात नेमणूक केली होती. तो पदमपुरा येथे कार्यरत होता. दरम्यान २३ फेब्रुवारी महिला पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये २५ वर्षीय महिला दाखल झाली होती. तिला पाच मार्चला डिस्जार्ज दिला जाणार होता. मात्र ही महिला डिस्चार्जची मागणी करत होती. त्यामुले पंजरकर याने रात्री दोन वाजता महिलेला मोबाईलवरून संपर्क साधत तुम्हाला डिस्चार्ज द्यायचा आहे, केबिनमध्ये या असे सांगितले. यावेळी पंजरकर यांनी आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिलेने महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र बदनामीच्या भीतीने महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नाही हे विशेष.
विधिमंडळापर्यंत गेले प्रकरण
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित डॉक्टराला महापालिका प्रशासनाने निलंबित केल्याचे उत्तर दिले. त्यानंतर आ.अतुल सावे यांनी महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ प्रशासनाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
डॉक्टर आणि रुग्ण यांची जुनी ओळख
महापालिकेचा कंत्राटी डॉ. पंजरकर व संबंधित महिला एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोघांनी डॉक्टरच्या केबिनमध्ये ४० मिनिटे गप्पा मारल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.