औरंगाबाद : तब्बल पाच महिन्यांनंतर बुधवारपासून ट्रॅव्हल्स बस रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शहरातून जवळपास ३० ट्रॅव्हल्स धावल्या. गेल्या काही महिन्यांत झालेली डिझेलची दरवाढ, कोरोनामुळे आता मर्यादित प्रवाशांची वाहतूक, मास्क, सॅनिटायझर आदींवरील खर्चामुळे ४० टक्क्यांपर्यंत भाढेवाढ झाल्याची माहिती खाजगी बसच्या संघटनेतर्फे देण्यात आली.
राज्य सरकारने परवानगी दिल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना आणि प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पहिल्या दिवशी बुधवारी पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, लातूर आदी मार्गांवरील बससेवेला प्रवाशांनी प्रतिसाद दिला. कोरोनामुळे खबरदारी म्हणून स्लिपर बसमधून २० प्रवाशांची वाहतूक केली जात आहे, तर सिटिंग बसमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी वाहतूक केली जात आहे. यात आसन क्षमतेच्या बसमध्ये एक आसन रिकामे ठेवले जात आहे.
कोरोनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. प्रवासापूर्वी प्रवाशांच्या तापमानाची तपासणी केली जात आहे. प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर, यूज अॅण्ड थ्रो बेडशीट देण्यात येत आहे. कोरोनामुळे मर्यादित प्रवाशांची वाहतूक करावी लागत आहे. गेल्या काही महिन्यांत ३० रुपयांनी डिझेलचे दर वाढले. त्यामुळे भाडेवाढ करावी लागल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. ट्रॅव्हल बसच्या प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.
काही मार्गांवरील भाडेपूर्वी मुंबईचे भाडे ७०० रुपये होते. आता मुंबईचे भाडे १३०० रुपयांपर्यंत वाढवावे लागले आहे. सोलापूरसाठी पूर्वी स्लिपर बसचे ५५० रुपयांपर्यंत भाडे होते. हे भाडे आता ७५० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. पुण्यासाठी ६०० रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागत आहे. नागपूर स्लिपर बसचे भाडे २ हजार रुपयांपर्यंत आकारण्यात येत आहे. वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स एजन्सीचे दर वेगवेगळे आहेत. एकूणच कोरोनाच्या आडून खासगी प्रवासी वाहतूकदार प्रवाशांची लूट करणार आहेत.
कोरोनापूर्वी डिझेल ६० रुपये लिटर होते. आता ८१ रुपयांपर्यंत वाढले आहे. कोरोनामुळे बसमधील आसन क्षमता कमी करण्यात आली आहे. प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर आदी सुरक्षा साहित्य देण्यात येत आहे. त्यामुळे बसच्या तिकीट दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ करावी लागली आहे. प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची सक्ती नाही; परंतु प्रवाशांनी खबरदारी म्हणून वैद्यकीय प्रमाणपत्र घेतले पाहिजे. प्रवाशांची योग्य ती काळजी घेतली जाईल.- पुष्कर लुले, सहसचिव, बस ओनर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स एजंटस असोसिएशन