कोरोनाने थेट पास, विद्यार्थ्यांमध्ये हर्षोल्हास, अभ्यासू मात्र नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:27+5:302021-06-16T04:06:27+5:30
जयेश निरपळ गंगापूर : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तालुक्यातील १ लाख १५ ...
जयेश निरपळ
गंगापूर : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तालुक्यातील १ लाख १५ हजार ४३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा न देताच पुढच्या वर्गात उडी घेतली आहे. मात्र अभ्यासासाठी दिवसरात्र एक केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मागील वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहे, मुलांना अभ्यासाची सवय राहिली नसल्याने व यंदा देखील प्रत्यक्ष १५ जूनला शाळा सुरू होण्याचा मुहूर्त हुकणार असल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
कोरोनामुळे सर्वात जास्त झळ शिक्षण क्षेत्राला बसली असून गत १५ महिन्यांपासून प्राथमिक शिक्षण प्रत्यक्ष बंदच आहे. यामुळे मुलांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. तालुक्यातील १९ केंद्रांतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मिळून एकूण ५२४ शाळांपैकी २९० खाजगी तर २३४ जि. प. शाळांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खाजगी शाळेतील ८५५६५ तर जि.प. मधील २९८७२ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहे. यात दहावीच्या ६ हजार ८०० व बारावीच्या ४ हजार १०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र अभ्यासू विद्यार्थ्यांना कष्टाचे योग्य फळ मिळणार नसल्याने ते नाराज आहेत.
चौकट
पालक चिंतेत
सलग शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय राहिली नसून अभ्यासाची गोडी कमी झाल्याने पालकांच्याही चिंतेत मोठी भर पडली आहे. त्यात ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल आल्याने गेम खेळणे व इतर प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे उशिरा का होईना सरकारने परीक्षा घ्यायला हवी होती, जेणेकरून परीक्षेच्या भीतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असता, असे मत पालकांमधून व्यक्त होत आहे.
कोट
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. त्यात विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार असल्याने ते अभ्यास करणार नाहीत. रुग्ण कमी झाल्यावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला हव्या होत्या.
-ॲड. कृष्णा ठोंबरे, पालक