औरंगाबाद : शासनाने महापालिकेला रविवारी रात्री १३ हजार लसी दिल्या होत्या. सोमवारी शहरातील ५६ केंद्रांवर नागरिकांना १० हजार ३०४ डोस देण्यात आले. दुपारनंतर अनेक केंद्रांवर लस संपली. नागरिकांना लस न मिळताच माघारी फिरावे लागल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.
४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्याकरिता रविवारी रात्री उशिरा मनपाला १३ हजार लसी प्राप्त झाल्या. त्यासोबतच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ४ हजार ३५० लसी मिळाल्या. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाने सोमवारी ५६ केंद्रांवर लसीकरण केले जाणार असल्याचे जाहीर केले. लस आल्याचे कळताच नागरिकांनी सकाळपासूनच केंद्रांवर गर्दी केली. प्रत्येक केंद्रावर ५० किंवा १०० लसी देण्यात आल्या. नागरिकांची संख्या अडीचशे ते तीनशे असताना, लसीचा पुरवठा कमी झाल्याने अनेक नागरिकांना लस मिळाली नाही. सकाळपासून ताटकळत बसलेल्या अनेक नागरिकांना लस न घेताच माघारी फिरावे लागल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. आता महापालिकेकडे फक्त तीन हजार लसी शिल्लक आहेत. मंगळवारी सकाळी अवघ्या एक ते दीड तासामध्ये हा साठा संपणार आहे. २१ ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे मिळालेली लस देण्यासाठी टोकन पध्दत राबवली जात आहे. रांगेत बसलेल्या नागरिकांना टोकन देऊन त्यांचे लसीकरण करण्यात आले.१८ ते ४४ वयोगटातील ६०० जणांना लसशहरात १८ ते ४४ वयोगटासाठी सहा आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. नोंदणी करूनच लसीकरण केंद्रावर प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर २०० पेक्षा अधिक नागरिकांना लस मिळत नाही. त्यामुळे दिवसभर ६०० नागरिकांनाच लस देण्यात आली.