वाळूज महानगर : आदर्श पाटोदा ग्रामपंचायतीने स्व:खर्चातून गावातील जिल्हा परिषद शाळेत सर्व सुविधांयुक्त कोविड केअर सेंटर स्थापन केले आहे. गावातील कोरोना रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीने हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत असल्याने शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची उपचारांअभावी परवड होत आहे. तज्ज्ञांकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची हेळसांड थांबविण्यासाठी सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, ग्रामविकास अधिकारी पी. एस. पाटील, सदस्य लक्ष्मण मातकर, पूनम गाडेकर, बेबी पेरे, मंदा खोकड, मीरा जाधव, शामल थटवले, पुष्पा पेरे, सुनीता पेरे, छाया पवार यांनी गावात स्व:खर्चातून कोविड व क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
गावात संयुक्त कुटुंबे असून, व पुरेशा खोल्या नसल्याने एखाद्या सदस्याला कोरोनाची लागण झाल्यास सर्व कुटुंब बाधित होण्याची शक्यता असते. यासाठी स्वतंत्र क्वारंराईन सेंटर सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या कोरोनामुळे शाळेला सुट्या असल्याने गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या रिकाम्याच असल्याने जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड व क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे.
दोन खासगी डॉक्टरांची नेमणूकया केंद्रात कोविड रुग्णांसाठी आठ बेडची व्यव्यस्था केली आहे. याचबरोबर गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिमिटर, थर्मल गण, पंखे, शुद्ध पिण्याचे पाणी, अंघोळीसाठी गरम पाणी, औषधीचा साठा, रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, नाष्टा, चहा, जेवण, आदींची व्यवस्था केली आहे. कोविड रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामपंचायतीच्या खर्चातूृन दोन खासगी डॉक्टरांची नेमणूकही करण्यात आली आहे.