कोरोनाने एस. टी.चे चाक थांबले,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:02 AM2021-04-08T04:02:01+5:302021-04-08T04:02:01+5:30
डिझेल टाकायलाही पैसे नाहीत ! मध्यवर्ती बसस्थानक : २५ लाखांवरुन ४ लाखांवर राेजचे उत्पन्न, रजा घेऊन घरी जाण्याची चालक-वाहकांवर ...
डिझेल टाकायलाही पैसे नाहीत !
मध्यवर्ती बसस्थानक : २५ लाखांवरुन ४ लाखांवर राेजचे उत्पन्न, रजा घेऊन घरी जाण्याची चालक-वाहकांवर वेळ
संतोष हिरेमठ
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील एस. टी. महामंडळाच्या काही आगारांकडे बसमध्ये डिझेल टाकण्यासाठीही पैसे नाहीत. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचीही हीच अवस्था झाली आहे. डिझेलअभावी बस आगारातच उभ्या करण्याची वेळ वारंवार ओढावत आहे. याचा फटका चालक-वाहकांना बसत आहे.
मध्यवर्ती बसस्थानकात डिझेलचा टँकर आला नाही, बस जागेवर उभ्या कराव्या लागत आहेत. चालक-वाहकांवर रजा घेऊन घरी जाण्याची वेळ आली आहे, अशी ओरड गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. आगाराच्या प्रवेशद्वारावर उभे राहून कर्तव्य मिळण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर ओढावत आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. रोज दीड हजारांच्या घरात रुग्णांची भर पडत आहे. राज्यभरात कडक निर्बंध लावण्याची वेळ ओढावली. या सगळ्यामुळे प्रवास टाळण्यावर भर दिला जात आहे. प्रवासी भारमान ५० टक्क्यांखाली आहे. परिणामी उत्पन्नातही घट झाली आहे. रोजचे उत्पन्न २५ लाखांवरुन ४ लाखांवर घसरले आहे. पूर्वी डिझेलचा टँकर क्रेडिटवर मिळत असे. परंतु, आता आगाऊ रक्कम भरल्यानंतरच डिझेल दिले जाते. त्यामुळे डिझेलच्या टँकरसाठीही पैसे निघत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आजघडीला १४० फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. आगारात जागोजागी बस उभ्या असल्याचे पाहायला मिळते.
----
आगारातील एकूण बसेस - १४३
एकूण कर्मचारी - ५५३
चालक - २५६
वाहक - १७७
रोजच्या फेऱ्या - २७२
रोजचे नुकसान - १५ ते २० लाख रुपये
----
गेले वर्ष तोट्याचेच
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर लाॅकडाऊन पाळण्यात आले. तेव्हा तब्बल १५१ दिवस एस. टी. महामंडळाची बससेवा ठप्प होती. २० ऑगस्ट २०२०पासून आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्यानंतर ‘एस. टी.’ची सेवा सुरळीत झाली. परंतु, प्रवासी संख्येत पूर्वीच्या तुलनेत मोठी घट पाहायला मिळाली. त्यामुळे संपूर्ण वर्ष तोट्यातच गेले.
-----
अनेक मार्गांवरील बससेवा बंद
कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेक मार्गांवरील बससेवा सध्या बंद आहे. मध्यवर्ती बसस्थानकातील इंदूर, निजामाबाद, गाणगापूर, नांदेड, परभणी, ग्रामीण भागातील दरेगाव, मोडेश्वर, वाकी आदी बससेवा बंद आहे. आजघडीला १३६ जाणाऱ्या फेऱ्या आणि १३६ येणाऱ्या फेऱ्या सुरू आहेत.
------
उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न
उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केला जात आहे. एस. टी. ही जनसेवेसाठी आहे. त्यामुळे सेवेला अधिक महत्त्व दिले जात आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसेस सोडण्यात येतात.
- बाबासाहेब साळुंके, सहाय्यक वाहतूक निरीक्षक