Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर ३.२५ टक्क्यांवर; आरोग्य यंत्रणेचे मृत्यू रोखण्यावर लक्ष केंद्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 07:47 PM2020-08-11T19:47:12+5:302020-08-11T19:50:39+5:30
जिल्हात १३ मे पासून कोरोनामुळे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी-अधिक होत राहणार आहे. त्यामुळे रुग्णसंख्यावाढीच्या प्रश्नाऐवजी रुग्णांचे मृत्यू रोखण्याकडे आरोग्य विभागाने अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हात १३ मे पासून कोरोनामुळे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे. त्यात एकही दिवस खंड पडलेला नाही. तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठांना कोरोना विषाणूचा धोका अधिक आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे जिल्ह्यात आॅक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.
जिल्ह्यात रोज रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येपेक्षा यातील गंभीर रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत आणि मृत्यू रोखले जातील, यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. ११ जुलै रोजी जिल्ह्याचा मृत्यूदर ४.२५ टक्के होता. महिनाभरात मृत्यूदर ३.२५ टक्के झाला.
घाटी रुग्णालयात कोरोनाचे गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. घाटीत मंगळवारी दुपारपर्यंत १४१ गंभीर रुग्ण दाखल होते. रुग्णांसाठी डॉक्टरांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते; परंतु उशिरा दाखल होण्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळत नाही आणि मृत्यू ओढवतो. त्यामुळे वेळीच रुग्णालयात दाखल होणे महत्त्वाचे असल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले.
महिनाभरात २०८ रुग्णांचा मृत्यू
११ जुलै रोजी जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही ८,२१६ होती, तर एकूण मृत्यूचा आकडा हा ३५० होता. महिनाभरात २०८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर रुग्णसंख्या दुप्पट झाली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या मंगळवारी (दि.११) दुपारपर्यंत १७,१२५ झाली, तर एकूण मृतांची संख्या ५५८ झाली.
५० वर्षांवरील रुग्णांकडे अधिक लक्ष
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत राहील; परंतु त्यापेक्षाही रुग्ण गंभीर होऊन मृत्यू ओढवणार नाही यावर अधिक भर दिला जात आहे. त्यासाठी ५० वर्षांवरील रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे.
- डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी