coronavirus : कोरोनाचा कहर त्यात पावसाला बहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 05:07 PM2020-08-19T17:07:23+5:302020-08-19T17:16:56+5:30
सतत पडणारा रिमझिम पाऊस सुखावणारा वाटत असला तरी पावसाळी हवा आणि थंड वातावरण अनेक संसर्गजन्य आजारांना पोषक ठरणारी आहे.
औरंगाबाद : आधीच कोरोनाचा कहर आणि त्यात पावसाला आलेला बहर यामुळे अनेक संसर्गजन्य आजारांना आपसूकच निमंत्रण मिळत आहे. कोरोना आणि पाऊस या दोन्ही गोष्टींमुळे आरोग्याबाबत अधिकाधिक जागरूक होण्याची गरज आहे, असा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत.
शहरात मागील ४ दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. सतत पडणारा रिमझिम पाऊस सुखावणारा वाटत असला तरी पावसाळी हवा आणि थंड वातावरण अनेक संसर्गजन्य आजारांना पोषक ठरणारी आहे. लॉकडाऊननंतर नागरिकांचा मुक्तसंचार वाढलेला आहे. कोरोनाची भीती कमी होऊन एकमेकांना भेटणे, खरेदीसाठी बाहेर पडणे याचे प्रमाणही वाढलेले आहे. या मुक्तसंचाराला आळा घाला आणि बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्या, असेही डॉक्टरांनी सुचविले.
हॉटेल बंद असल्याने खवय्यांना चटकदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता आला नाही. सध्या विविध खाद्यपदार्थांच्या ठेल्यांवर खवय्यांची गर्दी दिसत आहे; परंतु पावसाळ्यात उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा. यामुळे जुलाब, उलट्या होऊ शकतात. कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती या दिवसांमध्ये परवडणारी नाही. त्यामुळे घरी तयार केलेले सकस आणि ताजे अन्नच या दिवसांमध्ये खावे, असे डॉक्टरांनी आवर्जून सांगितले.
योगासने आणि प्राणायाम करावा
चालणे, धावणे, सायकलिंग असे व्यायाम करणे सध्या पावसामुळे अशक्य होत आहे. त्यामुळे घरच्या घरी नियमित योगासने आणि प्राणायाम करावा. श्वासावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्राणायामामुळेही अनेक आजारांचा संसर्ग रोखता येतो.
रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ देऊ नका
कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपण जी काळजी घेत आहोत, तीच काळजी पावसामुळे उद्भवणाऱ्या इतर संसर्गजन्य आजारांपासूनही आपल्याला सुरक्षित ठेवू शकते. मास्क वापरा, बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा, थंडी-पावसात जाणे टाळा आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून ६ फूट अंतर राखा. आवळा, मोसंबी, पेरू ही व्हिटॅमिन सीचा भरपूर पुरवठा करणारी फळे खा. झिंकयुक्त पदार्थांचे सेवनही वाढवा. रोगप्रतिकारशक्ती कमी होणार नाही, याची प्रत्येकानेच काळजी घ्यावी.
- डॉ. संजय पाटणे