CoronaVirus News: औरंगाबादेत कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण १० पट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 02:55 AM2021-04-08T02:55:27+5:302021-04-08T02:55:43+5:30
संक्रमण कमी; चाचण्यांमध्ये दुपटीने वाढ
औरंगाबाद : शहरात आठ दिवसांपूर्वी दररोज किमान १२०० पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. त्यामुळे महापालिकेने तपासण्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. दिवसभरात साडेचार ते पाच हजार तपासण्या होत आहेत. त्यात आठशे ते साडेआठशे रुग्ण आढळून येत आहेत. पूर्वीच्या तुलनेत संक्रमण काही प्रमाणात कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे; मात्र मृत्यूचे तांडव थांबायला तयार नाही.
मार्च महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. ६ मार्चपासून शहरात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण दहापट वाढले. खासगी आणि घाटी रुग्णालयात दररोज पंधरा ते पंचवीस रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोना बाधितांना वेळेवर उपचार मिळावेत या हेतूने महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यापक प्रमाणात तपासण्या करण्याचा निर्णय घेतला. आठ दिवसांपासून अंमलबजावणीही सुरू झाली. पूर्वी कमी प्रमाणात तपासण्या केल्यानंतरही हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते.
एप्रिल महिन्यात कोरोनाचा धोका कायम
एप्रिल महिन्यात कोरोना आणखी वाढेल असा अंदाज वर्तविण्यात येतोय. कोरोनाचा विषाणू जिवंत राहण्यासाठी माणसाचे शरीर शोधत असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मास्क घातलाच पाहिजे, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी सांगितले.