औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरसाठी मंजूर ऑक्सिजन प्लांट आता घाटी रुग्णालयात बसविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मेल्ट्रॉन येथील लिक्वीड ऑक्सिजनचा प्लांट रद्द करण्यात आला आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्लांट आता उभारले जाणार आहेत.
शहरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे ९ महिन्यांपूर्वी पालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये लिक्वीड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय झाला होता. निधीची उपलब्धता, निविदा आणि कार्यादेश यात हा प्लांट अडकला आणि आता तो बारगळल्यात जमा आहे. त्याऐवजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या माध्यमातून हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्लांट व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून दोन प्लांट उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला. त्यामुळे चार ऑक्सिजन प्लांट याठिकाणी उभारले जातील, असे स्पष्ट झाले होते, परंतु आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या माध्यमातून मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभारला जाणारा ऑक्सिजन प्लांट रद्द केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा प्रशासनाने हे दोन प्लांट घाटी रुग्णालयात उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
मला या संदर्भात माहिती नाहीमहापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, मेल्ट्रॉनमधील दोन प्लांट घाटीला देण्यात आल्याबद्दलची माहिती नाही, पण तसे काही झाले असेल तर त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. सध्या औरंगाबादमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता नाही.
५५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरजशहराला दररोज ५५ मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो, तेवढा ऑक्सिजन उपलब्ध आहे. एक दिवसाचा ऑक्सिजन आपल्याकडे शिल्लक असावा, असा आमचा प्रयत्न आहे, त्यादृष्टीने काम केले जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने जे दोन ऑक्सिजन प्लांट उभारले जाणार आहेत, त्या प्लांटचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास पाण्डेय यांनी व्यक्त केला.
जामनगरहून आणणार ऑक्सिजनऔरंगाबादसाठी कर्नाटकातून ऑक्सिजन आणण्यात येत होते. कर्नाटक सरकारने ऑक्सिजन देण्यास असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे आता गुजरातमधील जामनगरहून ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न करतोय, अशी माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.