अतिक्रमणांवर नगरसेवक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:20 AM2017-12-19T00:20:45+5:302017-12-19T00:20:49+5:30
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या होणाºया त्रासाबद्दल आक्रमकपणे व्यथा मांडल्या. काही ठिकाणी वैयक्तिक हितापोटी आणि राजकीय दबावापोटी अतिक्रमणे काढण्यात येत असल्याचा जोरदार आरोप नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी रस्त्यांवरील अतिक्रमणांच्या होणाºया त्रासाबद्दल आक्रमकपणे व्यथा मांडल्या. काही ठिकाणी वैयक्तिक हितापोटी आणि राजकीय दबावापोटी अतिक्रमणे काढण्यात येत असल्याचा जोरदार आरोप नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित केला. त्यांचा हा आरोप एमआयएमचे विरोधी पक्षनेते फेरोज खान यांच्या बराच जिव्हारी लागला. कारण फेरोज खान यांनी आपल्या वॉर्डातील अतिक्रमण अलीकडेच काढले आहे.
सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत दमडी महल येथील अतिक्रमणावरून एमआयएम नगरसेवकांनी रौद्र रूप धारण केले होते. काही नगरसेवकांनी महापौरांच्या अंगावरही धावून जाण्याचा प्रयत्न केला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी ताठर भूमिका घेतल्याने एमआयएम नगरसेवकांनी मौनव्रत धारण केले. राजदंडापर्यंत एमआयएम नगरसेवक पोहोचले तर त्यांनी राजदंडाला हात लावण्याची तसदी घेतली नाही. या प्रकरणात प्रभारी आयुक्तांनी खुलासा केला की, दोन दिवसांत संपूर्ण माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. हा वादग्रस्त विषय संपत असतानाच राज वानखेडे यांनी सलीम अली सरोवराच्या बाजूला आणि पाठीमागे मातीचा भराव टाकून अतिक्रमण होत असल्याचा मुद्या लावून धरला. या प्रकरणातही तीन ते चार दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन प्रभारी आयुक्तांनी दिले. दिल्लीगेट येथील रस्त्यावरील अतिक्रमणे त्वरित हटविण्याचे निर्देश महापौर घोडेले यांनी दिले. अतिक्रमणांसाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासनही महापौरांनी दिले.
विद्युतच्या फायलींसाठी आटापिटा
एलईडी दिवे लावण्यासाठी मनपाने ११० कोटींचे कंत्राट दिलेले आहे. या कंपनीला वर्कआॅर्डरही दिली आहे. दरम्यान, नगरसेवकांनी आपल्या वॉर्डांमध्ये एलईडी दिवे लावण्यासाठी लाखो रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून ठेवले आहे. या फायलींना ब्रेक लावण्याचे काम डी. एम. मुगळीकर यांनी केले. प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांच्या हातावर या फायली मंजूर करून घेण्यासाठी सोमवारी सर्वसाधारण सभेत एमआयएम नगरसेवक बराच ‘आटापिटा’करताना दिसून आले.२० दिवस झाले तरी १५० कोटींची निविदा प्रक्रियाच सुरू आहे. ही प्रक्रिया लवकर संपवून वर्कआॅर्डर द्या, असा आग्रह महापौरांसह नगरसेवकांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत धरला. लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याची निविदाही लवकरात लवकर अंतिम करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. २३ जानेवारी रोजी किमान ५ बसेस सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश प्रभारी आयुक्तांनी दिले.