औरंगाबाद : रेल्वेस्टेशन चौकातील पेट्रोलपंप त्वरित हलविण्यात यावा; अन्यथा मी नगरसेवकपदाचा राजीनामा आयुक्तांकडे सादर करीन, अशी घोषणा नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी मंगळवारी केली. पंप हलविल्याशिवाय मी पायात चप्पलही घालणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मागील एक वर्षापासून पेट्रोलपंप प्रश्नावर मी भांडत आहे. मनपा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी पेट्रोलपंपाच्या पाठीमागील मालमत्ताधारकांना नोटिसा दिल्या. त्याचा आणि माझ्या मागणीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे हा माझा हेतू नाही. पेट्रोलपंपासंदर्भात मी वेळोवेळी प्रशासनाला कागदपत्रेही सादर केली आहेत. या प्रकरणात माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर प्रचंड राजकीय दबाव येत आहे. मी कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. एका मध्यस्थामार्फत आर्थिक व्यवहारासंदर्भातही पंपचालकाकडून विचारणा झाल्याचा आरोप त्यांनी केला. आठ दिवसांपासून पंप बंद आहे, तरीही मनपाने कारवाई केलेली नाही. पंप हलवावा, एवढीच माझी मागणी आहे.
सर्वसामान्य नागरिकांना नोटिसा देण्याचे काहीच कारण नाही. हॉलिडे कॅम्प येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढा, रेल्वेस्टेशन भाजीमंडईचा रोड १२ मीटर रुंद करा या तीन मागण्यांसाठी मी प्रशासनासोबत भांडत आहे. जालाननगर येथील उद्यानात गैरप्रकार सुरू आहेत. तेथे सुरक्षारक्षक नेमावा. बीड बायपास रोडवरील अतिक्रमणे त्वरित हटविण्यात यावीत, माझ्या वॉर्डातील विविध प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणीही त्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास पक्षाकडे नव्हे, तर थेट आयुक्तांकडे राजीनामा सादर करण्याची घोषणा त्यांनी केली.