पैठण : पतसंस्थेने खातेदाराच्या खात्यावरून परस्पर कोट्यवधींचे व्यवहार केल्याने ७७ लाख रुपये दंड भरण्याची खातेदारास आयकर विभागाने नोटीस पाठविली. अन् या धक्कादायक प्रकाराने खातेदाराच्या पायाखालची जमीनच सरकली. चौकशी केल्यानंतर न्याय मिळविण्यासाठी त्याने दोन वर्षे लढा दिला. परंतु कोणीच ऐकत नव्हते. शेवटी न्यायालयात धाव घेतल्याने अन्यायाला वाचा फुटली.
याबाबत न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताच रेणुकामाता मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. या पतसंस्थेच्या पदाधिकारी व पैठण शाखेतील कर्मचाऱ्यांविरोधात शनिवारी रात्री उशीरा पैठण पोलिसात गुन्हा दाखल झाला. पैठण येथील विजय रामलाल सुते (४६) यांनी टाटा टेलिकॉमचे डिस्ट्रिब्युटर म्हणून काम करत असताना रेणुकामाता मल्टी क्रेडिट सोसायटीत करंट खाते उघडले होते. दोन वर्षांपासून व्यवसाय बदलल्याने सुते यांच्या खात्यावरील व्यवहार बंद होते. परंतु गेल्या वर्षी त्यांना आयकर विभागाची ७७ लाख रुपये दंड भरण्याची नोटीस आली आणि ते हादरलेच. त्यांनी थेट पतसंस्था गाठून विचारणा केली असता पतसंस्थेचे बिंग फुटले. सदरचा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर विजय सुते यांनी व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यांनी पतसंस्थेच्या अहमदनगर येथील मुख्य शाखेत जाण्याचा सल्ला दिला.
तेथे अध्यक्ष व सचिवांना भेटून घडलेला प्रकार सुते यांनी सांगितला. परंतु सर्वांनी हात वर केले. पतसंस्थेवर गुन्हा दाखल करावा म्हणून ठाणेदारापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अर्ज केले. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी पैठण न्यायालयात सुते यांनी दाद मागितली. न्यायालयाने संबंधितांवर गुन्हा दाखल केला.
यांच्यावर झाला गुन्हा दाखलप्रशांत चंद्रकांत भालेराव (अध्यक्ष, रेणुकामाता मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर) यांच्यासह पतसंस्थेचे सचिव व व्यवस्थापक. पैठण शाखेतील रोखपाल ललिता शिवाजी चौधरी, हरिश्चंद्र मोरे व दिनेश टकले यांच्याविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्या खात्यावर रक्कम पाठविली त्यांना मिळालीच नाहीखातेदार विजय सुते यांच्या खात्यावरून आरोपींनी विविध लोकांशी आरटीजीएस, नेटफंड ट्रान्सफर अकाऊंट क्लोज, लोन अगेन्स्ट फिक्स डिपॉझिट, सोने तारण कर्ज इत्यादी नोंदी एनएसबीआय, रेक्टीफाय इंट्री, मर्चंट बँक ट्रान्सफर दाखविले आहे. परंतु संबंधित खातेदारांच्या खात्यावर एक रुपयाची नोंद नाही. त्यामुळे पतसंस्थेने या आर्थिक व्यवहारात मोठी अफरातफर केल्याचे उघड झाले आहे. यात हवाला रक्कम वळतीचा संशय व्यक्त केला जात आहे.
हे प्रकरणी घडले तेव्हा मी येथे नव्हतो. अर्जदाराने अर्ज केल्यानंतर त्यांचे रेकाॅर्ड तपासले असता ते अहमदनगरच्या मुख्य शाखेत असल्याचे पुढे आले. त्यानुसार आम्ही त्यांना कळवले होते.- प्रसाद कचरे, शाखा व्यवस्थापक