लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा : महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल व तत्सम वैज्ञानिक परिषदेकडे नोंदणी नसताना अनधिकृतरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरूद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी या डॉक्टरला ताब्यात घेतले आहे़ राज्य शासनाच्या निर्देशावरून मागील दोन महिन्यांपासून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची तपासणी मोहीम सुरू होती़ या मोहिमेंतर्गत १२ एप्रिल रोजी धानोरा मोत्या येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे सुकेश मुजूमदार यांच्या दवाखान्याची तपासणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ संदीप काळे यांनी केली़ तपासणीत मुजूमदार यांच्या नावाने कोणत्याही प्रकारची पदवी, पदविका अथवा शैक्षणिक पात्रतेचा पुरावा आढळला नाही़ व्यवसायाबाबतचे पुरावे तातडीने तालुका आरोग्य कार्यालयात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या़ परंतु, २० जूनपर्यंत हे पुरावे सादर न केल्याने मुजूमदार यांच्याविरूद्ध चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली़ तालुका आरोग्य अधिकारी संदीप काळे यांच्या फिर्यादीवरून शासनाची व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे़ पोलिसांनी सुकेश इनामदार यास ताब्यात घेतले आहे़ सहाय्यक पोलीस निरीक्षक शेजवळ हे तपास करीत आहेत़
बोगस डॉक्टरांविरूद्ध गुन्हा
By admin | Published: June 21, 2017 11:37 PM