औरंगाबाद : राहुल जाधवने १० एप्रिल रोजी कुणाल जाधव विरोधात उस्मानपुरा ठाण्यात दिलेली तक्रारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत झालेल्या खुनाच्या घटनेला कारणीभूत ठरल्याचे समोर आले. मृत आशिष साळवे विरोधी गटासोबत राहत असल्याच्या कारणावरून आरोपींनी त्याच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रमानगरातील रहिवासी अविनाश जाधव आणि कुणाल जाधव यांचा रमानगरातीलच राहुल जाधवसोबत जुना वाद आहे. या वादातून सहा महिन्यांपूर्वी राहुलने आरोपींविरोधात उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तसेच ९ एप्रिल रोजी रात्री त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याप्रकरणी राहुलने कुणाल आणि त्याच्या साथीदारांविरोधात उस्मानपुरा ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. तेव्हापासून आरोपींचा राहुल जाधवविरुद्ध वाद वाढला आणि ही तक्रारच आशिषच्या खुनाला कारणीभूत ठरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत आशिष हा राहुलसोबत राहत होता. ही बाब आरोपींना खटकत होती. शिवाय १४ एप्रिल रोजी आरोपींनी राहुलला व्यासपीठावर येऊन मारण्याची खुली धमकी दिली होती.
त्यानुसार आरोपी १४ रोजी रात्री साडेदहा ते पावणेअकरा वाजेच्या सुमारास क्रांतीचौकाजवळील रविराज मित्रमंडळाच्या व्यासपीठावर गेले. यावेळी राहुल जाधव, आशिष साळवे आणि अन्य लोक मंचावर बसलेले होते. आरोपींनी राहुल जाधवचा फेटा ओढला. आरोपी भांडण करण्याच्या उद्देशानेच आल्याचे दिसताच आशिषने त्यांना खाली ढकलले. याचा राग आरोपींना आला. आशिष त्यांना तेथून जाण्याचे सांगत असताना आरोपी कुणालने धारदार चाकू आशिषच्या पोटात खुपसला आणि बाहेर ओढला. त्यानंतर ते तेथून पळून गेले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आशिषचा तासाभरात रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचा राग राहुल जाधववर होता, मात्र आशिषने आपल्याला ढकलून हाकलल्याने चिडून त्याला मारले.
आरोपींना दहा दिवस पोलीस कोठडीआशिष संजय साळवे (२५, रा.रमानगर) या तरुणाचा खून करणारे आरोपी अविनाश गौतम जाधव (२२) व आरोपी कुणाल गौतम जाधव (२०, दोघेही रा.रमानगर) यांना २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी सोमवारी (दि.१६) दिले.१४ एप्रिलला रात्री उपरोक्त आरोपी भावांनी आशिष साळवेचा खून केला होता. त्यांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षाने न्यायालयास विनंती केली की, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करावयाचे आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. मयतावरील हल्ल्यामागील नेमक्या कारणाचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी द्यावी. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.