पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून टाकल्या आहेत. मात्र, मागील सहा दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहेत. सकाळी कडक ऊन व रात्री वातावरणात गारवा निर्माण होत असल्याने सिल्लोड तालुक्यातील पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आणखी दोन दिवस पाऊस न आल्यास या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीची चिंता सतावत आहे. १ जूननंतर तुरळक ठिकाणी पाऊस पडला. हा पाऊस पेरणीयोग्य नसला तरी, अनेक शेतकऱ्यांनी पाऊस पडेल, या आशेवर पेरणी केली आहे. मात्र आता पाऊस थांबल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. ज्यांच्याकडे तजवीज आहे, ते शेतकरी ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पिके जगविण्यासाठी आटापिटा करीत आहेत, तर काही शेतकरी बाटलीने पाणी टाकून पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कोट
पावसाची वाट बघत आहे
पाऊस पडेल या आशेवर गुरुवारी तीन एकर मका पेरणी केली आहे. पेरणीसाठी जवळ जवळ वीस हजार रुपये खर्च आला आहे. मात्र आता पाऊस नसल्याने चिंता वाढली असून, चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.
- संतोष पुंगळे, शेतकरी दीडगाव, ता. सिल्लोड