सोयगाव : हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांवर पहिल्याच वेचणीदरम्यान पानगळ सुरु झाल्याने कपाशीच्या झाडांना गळ लागून पाने झडत असल्याचा चिंताजनक प्रकार मंगळवार दि. ६ रोजी उघडकीस आला असून सोयगाव तालुक्यातील कपाशीचा हंगाम संकटात सापडला आहे.
कपाशी पिकांच्या पहिल्या वेचण्या तालुक्यात सुरू झाल्या असून शेतकऱ्यांना कपाशीचे उत्पन्न हातात पाडून घेण्यासाठी नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. नुकतीच झालेली अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे काही मंडळात कपाशी पिके वाहून गेली तर काही मंडळात पाण्याच्या पुरात बुडाली. परंतु पावसाच्या उसंतीनंतर मात्र अचानक वाढते उन आणि पहाटेचे धुके यामुळे कपाशी पिकांवर परिणाम होवून कपाशीच्या पानांना गळ लागली आहे. त्यामुळे सोयगाव शिवारातील अनेक ठिकाणी कपाशी शेतीचे शिवार बोडखे झाल्याचे पहावयास मिळत आहे.
शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखली जाणारी कपाशी गळून जात असल्याने एकेका शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान होत आहे. याशिवाय पहिल्याच वेचनीत कापसाच्या बोंडातील वजनात मोठी तफावत आढळत आहे. तब्बल तीन ते पाच ग्रॅम वजनाची तफावत निर्माण झालेली असल्याने दिसायला डेरेदार परंतु वजनाला हलके अशी बोंडे झाडावर आढळत आहे. एकरी उतारा घसरला असून एकरी अकरा ते बारा उतारा देणाऱ्या सोयगाव तालुक्याला यंदाच्या हंगामात तीन ते पाच क्विंटल उतारा शेतकऱ्यांच्या हातात मिळत असल्याचे पहिल्याच वेचणीमध्ये आढळून आले आहे.