औरंगाबाद : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेडीवार यांच्या उपस्थितीमध्ये आयोजीत ओबीसी मेळाव्यात प्रास्ताविकामध्ये छगन भुजबळ यांच्यावर टीका करण्यात आल्याने समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अखेर मंत्री वड्डेटीवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्त्ये शांत झाले आणि मेळावा पार पडला.
करमाड येथे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता सुरु होणारा मेळावा दुपारी २ वाजता सुरु झाला. बालाजी शिंदे यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक करताना छगन भुजबळ यांनी पिवळ्या झेंड्याला राष्ट्रवादीकडे नेत ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक केल्याचे पाप केले अशी टीका केली. मेळाव्यातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. दहा ते बारा कार्यकर्त्यांनी स्टेजच्या समोर जमा होऊन बालाजी शिंदे यांना भुजबळ यांनी काय पाप केले ? याचा जाब विचारला. यामुळे गोंधळ उडाला. काही वेळानंतर मंत्री वड्डेटीवार यांनी मध्यस्थी करत माईकचा ताबा घेतला. छगन भुजबळ आमचे नेते असून आमचे आदर्श आहेत असे म्हणत वड्डेटीवार यांनी दोन्हीकडील कार्यकर्त्यांना शांत केले. यानंतर त्यांनी अर्धातास मार्गदर्शन केले.
समता परिषदेची दिलगिरी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे मेळाव्यात गोंधळ उडाला. यावर मेळाव्याच्या शेवटी समता परिषदेच्या मनोज घोडके यांनी दिलगिरी व्यक्त केली.