उर्दू पुस्तकांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल युवकांत जिज्ञासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:23 AM2018-02-19T00:23:56+5:302018-02-19T00:24:03+5:30
सोलापूरचा २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुण सय्यद शाह वाएज याने मराठीतून उर्दू भाषेत अनुवादित केलेले ‘शिवाजी महाराज के वफादार मुस्लिम सिपेसालार’ या पुस्तकाला शहरातील मुस्लिम तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. यातून तरुणांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जिज्ञासा वाढत असून, जोडीला कॉ. गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तकदेखील उर्दूत अनुवाद करून तरुणांच्या हाती देण्यात आले आहे.
शांतीलाल गायकवाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सोलापूरचा २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुण सय्यद शाह वाएज याने मराठीतून उर्दू भाषेत अनुवादित केलेले ‘शिवाजी महाराज के वफादार मुस्लिम सिपेसालार’ या पुस्तकाला शहरातील मुस्लिम तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. यातून तरुणांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जिज्ञासा वाढत असून, जोडीला कॉ. गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तकदेखील उर्दूत अनुवाद करून तरुणांच्या हाती देण्यात आले आहे.
प्रेम हनवते यांनी लिहिलेल्या ‘शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक’ या पुस्तकाचा सय्यद शाह वाएज याने उर्दूत उपरोक्त अनुवाद केला आहे. सोलापूर विद्यापीठात एम. ए. इतिहासाच्या प्रथम वर्षाला शिकणारा वाएज याचे आजोबा अॅड. सय्यद शाह गाजीउद्दीन हे उर्दूचे ख्यातनाम इतिहास संशोधक आहेत. त्यांनीदेखील फुले, शाहू, आंबेडकर यांची चरित्रे उर्दूतून लिहिली आहेत. अॅड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटरने प्रकाशित केलेले हे पुस्तक ६३ पानांचे आहे. रिफाई रियासत (जनकल्याणकारी राज्य), शिवाजी की मजहबी पॉलिसी (शिवाजीची धर्मनीती), शिवाजी महाराज का खवातील के ताल्लूकसे नजरिया (शिवाजी महाराजांचा महिलाविषयक दृष्टिकोन), दुश्मनों का दिल जितने का तरिका (शत्रुचे मन वळविण्याचे तंत्र), सिद्दी हिलाल शिवाजी महाराज का बहाद्दर सरदार, इमानदारिका दारोमदार मजहबसे नही (विश्वासपात्र ठरण्याचा संबंध धर्माशी नाही), शिवाजी की बहरी फौज में मुसलमानों की बहादुरी आणि रुस्तम जमान की स्वराजसे वफादारी, या आठ पाठात हे पुस्तक विभागले आहे. त्यातून महाराजांच्या एकूण दृष्टिकोनाचा विचार केला आहे. असे प्रमुख प्रसंग चितरण्यात आले आहे.
महाराजांचे विचार जाणून घेण्याची भूक
औरंगाबादेतील मिर्झा बुक सेंटरचे मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी सांगितले की, मुस्लिम युवकांना राष्ट्रपुरुष व त्यांच्या विचारांची ओळख व्हावी यासाठी आम्ही कार्यरत आहोत. शालेय मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत पुस्तकांची निर्मिती करून ती मुलांना सवलतीत उपलब्ध करून देत आहोत. परिवर्तनाच्या चळवळीचे अग्रणी फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांची उर्दू भाषेत अनुवादित पुस्तके आम्ही मुलांना दिली व त्यांचा चांगला परिणाम दिसू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अधिक माहिती व त्यांचे पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचार मुस्लिम तरुणांना समजावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवाजी महाराजांचे उर्दूत सोपे व सुबोध पुस्तक नव्हते. ‘शिवाजी महाराज के वफादार मुस्लिम सिपेसालार’ या पुस्तकाने ही उणीव भरून निघते आहे. जानेवारी २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या चार आवृत्त्या दोन महिन्यांत संपल्या आहेत. यावरून शिवाजी महाराजांचे विचार जाणून घेण्याची युवकांतील भूक लक्षात यावी.