दोन महत्वाची शहरे रेल्वेपासून तोडली, औरंगाबादहून नागरपूरसाठी रोज धावतात ६८ ट्रॅव्हल्स
By संतोष हिरेमठ | Published: November 17, 2022 06:40 PM2022-11-17T18:40:37+5:302022-11-17T18:42:42+5:30
औरंगाबाद-नागपूर : कोरोनापूर्वी ३ रेल्वेंची कनेक्टिव्हिटी, आता फक्त बसचा पर्याय
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. उद्योग, व्यवसाय, व्यापार, शिक्षणाबरोबर राजकीयदृष्ट्याही हे शहर महत्त्वाचे आहे. मात्र, औरंगाबादहून नागपूरला जायचे असेल तर सध्या ट्रॅव्हल्स आणि एसटी बसशिवाय पर्यायच उरला नाही. कारण कोरोनाकाळात ३ रेल्वेंची नागपूर कनेक्टिव्हिटीच तुटली आहे आणि त्याकडे लोकप्रतिनिधींबरोबर ‘दमरे’चे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, औरंगाबादहून दररोज ६८ ट्रॅव्हल्स नागपूरसाठी धावत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर काही कालावधीसाठी सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्यांत नंतर रेल्वे सुरू करण्यात आला. या सगळ्यात नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूरऐवजी आदिलाबादहून सुरू करण्यात आली. कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेस ही रेल्वे १९ फेब्रुवारी २०२१ पासून लातूरमार्गे वळविण्यात आली, तर अजनी-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस अजूनही रुळावर आलेली नाही. नागपूरला जायचे असेल तर आजघडीला प्रवाशांना ट्रॅव्हल्स, एसटी बसने प्रवास करण्याशिवाय पर्याय उरला नाही. ट्रॅव्हल्सने प्रवास करताना खिसा रिकामा करण्याचीही वेळ प्रवाशांवर ओढावत आहे. त्यामुळे नागपूरसाठी पुन्हा एकदा रेल्वे कनेक्टिव्हिटी देण्याची मागणी जोर धरत आहे.
रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळावी
औरंगाबादला नागपूरसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे. सल्लागार समितीच्या बैठकीत दक्षिण मध्य रेल्वेकडे यासंदर्भात मागणी केली जाईल.
- महेश मल्लेकर, सदस्य, दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समिती
‘नंदीग्राम’ पूर्वीप्रमाणे चालवा
औरंगाबादहून अलोका, अमरावतीमार्गे नागपूरसाठी नवीन रेल्वे सुरू केली पाहिजे. शिवाय नंदीग्राम एक्स्प्रेसला पुन्हा एकदा नागपूरपर्यंत नेले पाहिजे.
- राजकुमार सोमाणी, रेल्वे प्रवासी सेना
दोन रेल्वेंची आवश्यकता
औरंगाबादहून अमरावती आणि औरंगाबाद-नागपूरसाठी रेल्वे सुरू करण्याची गरज आहे. औरंगाबादमार्गे नागपूरसाठी धावणाऱ्या तीन रेल्वेंची कनेक्टिव्हिटी तुटली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक
- औरंगाबादहून नागपूरला धावणाऱ्या ट्रॅव्हल्स : ६८
- ट्रॅव्हल्सचे नागपूरसाठीचे भाडे : ७०० रुपये ते २३०० रुपये
- औरंगाबादहून नागपूरला धावणाऱ्या एसटी : १३
-‘एसटी’चे नागपूरसाठी भाडे : ७६० ते १११०