संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना म्हटला की, एकच थरकाप उडतो. अगदी जवळच्या व्यक्तीपासूनही लोक दूर पळतात. त्यातही कोरोनाने मृत्यू ओढवला तर नातेवाईक आणि मृत व्यक्तीत दरीच निर्माण होते. कुटुंबीयांना दुरूनच मृताला निरोप द्यावा लागतो. अशा परिस्थितीत मात्र जीवावर उदार होऊन रुग्णालयातील काही कर्मचारी मृतदेह हाताळण्याचे काम करीत आहेत. तुम्ही म्हणाल, या कामाचे त्यांना बक्कळ पैसे मिळत असतील; पण तसे नाही. अवघ्या ३१० रुपये रोजगाराने हे कर्मचारी काम करीत आहेत, तेही कोणत्या तक्रारीविना, फक्त माणुसकी डोळ्यांसमोर ठेवून.
घाटी रुग्णालयात कोरोनामुळे मयत पावणाऱ्या रुग्णांचे मृतदेह पॅक करून अंत्यविधीसाठी वॉर्डातून शवविच्छेदनगृहात पाठविण्याचे काम भावनिक अॅम्ब्युलन्स ग्रुप सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून होत आहे. या संस्थेला ३ महिन्यांचे कंत्राट देण्यात आलेले आहे. अगदी दिवसरात्र २४ तास या कामासाठी संस्थेचे कर्मचारी दक्ष असतात. मृतदेह वाॅर्डातून शवविच्छेदनगृहात लवकरात लवकर हलविण्यासाठी प्रयत्नशील असतात. हे काम करताना मयत कोरोना रुग्णाची हाताळणी करावी लागते. त्यामुळे सर्वाधिक खबरदारी या कर्मचाऱ्यांना घ्यावी लागते. पीपीई किट, मास्क, हातमोजे यांचा योग्यप्रकारे वापर करण्यावर भर दिला जातो. घरी ज्येष्ठ, लहान मुले असतात. त्यामुळे घरी गेले की, आधी अंघोळ केली जाते. तसेच लहान मुले, ज्येष्ठांपासून सध्या थोडे दूर राहण्यावरच भर असल्याचे काहींनी सांगितले.
---
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीने भरलेली पदे-२२
दिवसाला रोजगार-३१० रुपये
कंत्राट ०३ महिन्यांचे
----
काय असते काम?
कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जात नाही. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्याचा मृतदेह वाॅर्डातून शवागृहात आणला जातो. शवागृहातून मनपाने नेमलेली संस्था, बचतगट मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जातात. वॉर्डातून मृतदेह शवागृहात आणण्यापूर्वी वॉर्डातच मृतदेह एका विशिष्ट पॅकिंग बॅगमध्ये बंदिस्त केला जातो. हे काम कंत्राटी संस्थेचे कर्मचारी करतात. मृतदेह पॅक करून तेच कर्मचारी रुग्णवाहिकेतून मृतदेह रुग्णवाहिकेतून शवागृहात पोहोचवितात.
---
पोट भरेल एवढे पैसे, पण शासनाने आमच्याकडेही पहावे
- मृतदेह पॅक करण्याचे काम करताना पैशांचा कधीही विचार केला नाही. कोरोनासारख्या महामारीत काम मिळाले, हे अधिक महत्त्वाचे वाटते, असे कर्मचाऱ्यांनी म्हटले.
- या कामामुळे महिन्याला ९ हजार रुपये मिळतात. पोट भरण्यापुरते हे पैसे आहेत; पण त्यापेक्षा आपल्याला या क्षेत्रात काम करता येत आहे, हे अधिक महत्त्वाचे वाटते, असे कर्मचारी म्हणाले.
- हे काम करण्यासाठी कोणीही सहज पुढे येत नाही. पण, आम्ही हे काम करीत आहोत. सुरुवातीला भीती होती, आता नाही. शासनाने आमच्याकडेही पहावे, असे कर्मचारी म्हणाले.
- वेतन अधिक मिळावे, ही कोणत्याही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची इच्छा असते. पण हे काम नाही, तर एक जबाबदारी आहे, एकप्रकारे रुग्णसेवा असल्याचेही कर्मचारी म्हणाले.
---------
मृतदेहांचे पॅकिंग आणि शिफ्टीग, कामाचे मोल ओळखावे
महिन्याला ९ हजार रुपये वेतन मिळते. आजपर्यंत कधी वेतनाचा विचार केला नाही. माणुसकी म्हणूनच मृतदेह पॅकिंगचे काम करतो, असे मला आवर्जून सांगायचे आहे. हे काम करताना कधीही भीती वाटली नाही. स्वत: योग्य काळजी घेऊनच काम करतो.
-विक्रांत बनसोडे
------
एकमेकांना सहकार्य करतो
कोरोनामुळे अनेकांना रोजगार मिळत नसल्याची स्थिती आहे. माझ्यासह अनेक जण हे काम करण्यास तयार झाले. एकमेकांच्या सहकार्याने आम्ही कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह वाॅर्डातून शवविच्छेदनगृहापर्यंत आणतो.
- कुणाल बचके
----
त्याच्याजवळ आम्ही असतो
या कामाची कोणतीही वेळ ठरलेली नाही. ठरावीक वेळेतच काम करता येईल, असे नाही. मृत्यू कधी ओढवतो, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे २४ तास कामासाठी तत्पर असतो. मृत्यूनंतर ज्याच्याजवळ कोणीही नसतो, त्याच्याजवळ आम्ही असतो.
- प्रकाश बनसोडे
--
कोणीही तक्रार करीत नाही
या कामातून किती पैसे मिळतात, ही परिस्थिती सर्वांना माहिती आहे. त्यामुळे देण्यात येणाऱ्या वेतनाविषयी कोणीही तक्रार करीत नाही. कोविड योद्धा म्हणून काम करताना समाजसेवा, माणुसकी म्हणूनच सर्व जण काम करीत आहे. हे काम करताना स्वत:च्या जीवाचीही पर्वा करत नाही. शासनाकडून काहीतरी पदरी पडेल, अशीही आशा सर्वांना आहे.
- किरण रावल, भावनिक अॅम्ब्युलन्स ग्रुप