सराळा बेटाला पुराचा धोका; महंतांचा बेट सोडण्यास नकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 01:57 PM2019-08-05T13:57:02+5:302019-08-05T14:27:07+5:30

आपत्कालीन परिस्थितीसाठी बोटसह पथक सज्ज

Danger of flood to Sarela Island; The Mahants refuse to leave the island | सराळा बेटाला पुराचा धोका; महंतांचा बेट सोडण्यास नकार 

सराळा बेटाला पुराचा धोका; महंतांचा बेट सोडण्यास नकार 

googlenewsNext
ठळक मुद्देवांजरगावचे ३६० नागरिक सुरक्षीत जागी वांजरगाव ते सराला गोवर्धनदरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावचा संपर्क तुटलावैजापूर- श्रीरामपूरकडे जाणारे सगळेच रस्ते पाण्यातया मार्गावरील २२ गावांचा संपर्क तुटला

- मोबीन खान/बाबासाहेब धुमाळ 

वैजापूर (औरंगाबाद ) : नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे वरच्या भागातील धरणांचे दरवाजे उघडल्याने जवळपास २ लाख क्युसेक वेगाने पाणी गोदावरीत झेपावल्यामुळे प्रशासनाने वांजरगावसह शिंदे वस्ती, वाक वस्ती तसेच सय्यद वस्ती येथील एकूण ३६० नागरिकांना रात्री १० वाजता प्रशासनाने पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षीत स्थळी हलविले. प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी, तसेच तहसीलदारांनी वैजापूर तालुक्यातील सराला बेटाला असलेल्या धोक्यामुळे महंत रामगिरी महाराज यांना सुरक्षितस्थळी येण्याबाबत विनंती केली. मात्र, बेट सोडण्यास नकार दिल्याने प्रशासनाची अडचणी झाली.

नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पाऊस, तसेच विविध धरणांतून जवळपास २ लाख क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात येत असल्याने शनिवारीच गंगापूर, वैजापूर, प्रशासनाने ६९ गावांना इशारा होता. रात्रीतून गोदावरीत होणारी पाण्याची आवक वाढल्याने गोदावरी नदी पात्र सोडून वाहत आहे. यामुळे वैजापूर तालुक्यातील १७ गावांना पाण्याची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने रविवारी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार विनोद गुंडमवार, गटविकास अधिकारी अजय पवार, सहायक पोलीस निरीक्षक हरीशकुमार बोºहाडे यांनी नदीकाठच्या गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी तालुक्यातील वांजरगावसह येणाऱ्या शिंदे वस्ती, वाक वस्ती, तसेच सय्यद वस्तीला  पुराचा वेढा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन दुपारी काही नागरिकांसह महिला, मुले, मुलांना येथील जिल्हा परिषदेत हलविण्यात आले होते. मात्र, रात्री १० च्या सुमारास पाण्याचा धोक्यामुळे वांजरगावसह शिंदे वस्ती, वाक वस्ती तसेच सय्यदवस्तीवरील जवळपास ३६० नागरिकांना सुरक्षीत स्थळी नेण्यात आले.
गटविकास अधिकारी पवार, एच.आर. बोयनर, तलाठी जितेंद्र चापानेरकर, सरपंच किशोर कोळेकर, उपसरपंच अशोक गागरे, तसेच एनडीआरएफ दलाचे जवान, आरोग्य, शोधपथक, पोलीस पथकेही ठीकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत, तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी येथे बोटीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 

वांजरगाव ते सराला गोवर्धनदरम्यान पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे. गोदावरीला महापूर आला आहे. त्यामुळे वैजापूर- श्रीरामपूरकडे जाणारे सगळेच रस्ते पाण्यात गेल्याने रविवारी या मार्गावरील २२ गावांचा संपर्क तुटला आहे, तसेच १७ गावांतील नदीकाठावरील बऱ्याच नागरिकांना रविवारी सायंकाळपर्यंत सुरक्षितस्थळी पाठविले जाऊ शकते.

तालुक्यातील सावखेडगंगा व श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर गावाला जोडणाऱ्या शिऊर- श्रीरामपूर महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. पुरामुळे पुरणगाव, लाखगंगा, बाबतारा, डोणगाव या गावांतील काही वस्त्यांवरील घरांमध्ये पाणी शिरले होते. सावखेडगंगा शिवारातील दीडशे नागरिक असलेल्या हिराडे वस्तीलाही पाण्याचा वेढा  पडू शकतो. 

काही गावांतील वीजपुरवठा खंडित 
गोदामाई पात्र सोडून वाहत असल्याने गोदाकाठ परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यातच काही ठिकाणी विद्युत खांब कोलमडल्याने विजेच्या तारा जमिनीवर पडल्या. पाण्याची पातळी वाढत असल्याने महावितरण कंपनीने काही गावांतील विद्युत पुरवठा खंडित केला आहे. पूरपरिस्थिती ओसरल्यावर या भागातील वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

‘त्या’ आठवणीने नागरिक पुन्हा भयभीत
आॅगस्ट २०१६ ला गोदावरी नदीपात्रात ९० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. त्याच रात्री पाण्याचा विसर्ग दीड लाखापर्यंत गेला होता आणि ५ आॅगस्टला अडीच लाख क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने अडीच हजार लोकांना स्थलांतर करावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. विशेष म्हणजे तीन वर्षांनंतर गोदावरीने पुन्हा याच तारखेला रौद्ररूप धारण केल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.

प्रशासनाच्या अडचणींत वाढ
प्रशासनातर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप व तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी बेटास पुराचा वेढा पडताच महंत रामगिरी महाराज यांना सुरक्षितस्थळी येण्याबाबत विनंती केली. मात्र, बेटातील गोशाळेतील शेकडो गायी, बेटावर अखंड वीणावादन परंपरा सुरू असून विद्यार्थी अंध, अपंग असल्यामुळे बेट सोडणार नसल्याचा महाराजांनी पवित्रा घेतल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

नागमठान बेटाला पुराचा वेढा पडला असून या ठिकाणी अग्निशमन दल व एन. डी. आर. एफची टुकड़ी दाखल  झाली आहे या बेटावर महाराजांसह  40 ते 50 इतर जन आहे. तर आगरकानडगांव  शिवारातील चौपाळयाला देखील पुराच्या पाण्याने वेढले असून याठिकाणी पंधरा ते वीस महिला, पुरुष ,लहान मुले अडकले आहेत.

Web Title: Danger of flood to Sarela Island; The Mahants refuse to leave the island

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.