औरंगाबाद : नारेगाव कचरा डेपोच्या रस्त्यावर विनापरवाना धोकादायक गोदाम व उद्योग सुरू आहेत. त्यांच्याकडे अग्निशामक विभागाचेही नाहरकत प्रमाणपत्र नाही, सुरक्षेची कोणतेही साधने नाहीत. दोन वर्षांत आगीच्या ५ गंभीर घटना घडल्या आहेत, त्यामुळे आता खबरदारी म्हणून पोलीस सर्वांना नोटिसा बजावणार आहेत.
कचरा डेपो हटविण्यासाठी परिसरातील नागरिकांना प्रचंड संघर्ष करावा लागला. आता परिसरात केवळ ६०० चौरस फुटांच्या जागेवर पत्र्यांचे शेड उभे करून कारखाने उभे केलेले आहेत. त्यासाठी गरजेचा किमान शॉप अॅक्टचा परवाना आहे काय? किती दुकाने, गोदामे तसेच लघु उद्योग सुरू आहेत, त्यांच्याकडे औद्योगिक महामंडळ, कामगार उपायुक्त कार्यालय, मनपाकडून रीतसर परवाने आहेत किंवा नाही, हे तपासण्यासाठी एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे नोटिसा पाठविणार आहे. ज्या ठिकाणी आगी लागल्या त्या आगी निवासी वसाहतीलगतच होत्या. या गोदामाला निवासी वसाहतीत परवानी देण्यासाठी लागणारे निकष कोणीही पाळलेले दिसत नाहीत.
नारेगाव परिसरात फोमच्या गोदामाला सोमवारी लागलेल्या आगीत आणखी दोन दुकाने भक्ष्यस्थानी पडली. एका दुकानाची आग विझविल्यानंतर दुसऱ्या दुकानाने पेट घेतला. आगीसोबत ४ तासांचा संघर्ष अग्निशामक विभागाला करावा लागला. नुकसान वगळता जीवित हानी टळली.
नियम धाब्यावरदुकान, गोदाम किंवा वर्कशॉप असल्यास त्याचे काही निमय पाळणे गरजेचे असून, त्यानंतरच तुम्हाला उद्योग व व्यवसाय सुरू करता येतो. खाद्यान्नाचे दुकान असले तरी शॉप अॅक्ट आणि अन्न औषधी विभागाचा परवाना घेणे आवश्यक आहे. त्यापैकी परवाना घेण्याकडे कुणाचा कल दिसत नाही, फक्त पत्र्याचे शेड उभे करून दुकान सुरू केले जाते. सुरक्षेसाठी कुणाकडेही आग विझविण्याचे यंत्र नाही. ते दुकानात ठेवणे अनिवार्य आहे.
मनपा अधिकाऱ्यांनी सर्व्हे करावानारेगाव परिसरातील पूर्वेला कचरा डेपोपर्यंत नागरी वसाहत वाढली असून, गल्ली गल्लीत व्यावसायिकांची दुकाने तसेच गोदामे उभी आहेत. घरांना कर लावण्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, तर व्यावसायिकांनी सुरू केलेल्या व्यवसायाची माहिती काढून सांगता येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
परवानगी तपासणारनागरी वसाहतीत धोकादायक कारखाने कोणत्या नियमाने सुरू झाली व त्यांच्याकडील कागदपत्रे तपासण्यासाठी नोटीस पोलीस ठाण्यामार्फत पाठविणार आहे. - सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक