बंदी असतानाही मद्यपींचा भरला 'दरबार'; गुन्हेशाखेची २८ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 02:59 PM2020-08-13T14:59:18+5:302020-08-13T15:12:44+5:30
लॉकडाऊनपासून शहरातील हॉटेल, बीअर बार आणि परमिट रुममध्ये ग्राहकांना बसण्यास मनाई आहे.
औरंगाबाद: हॉटेलला परवानगी नसताना बीड बायपासवरील हॉटेल दरबारमध्ये दारू पित बसलेल्या २५ ग्राहकांसह २८ जणाना गुन्हेशाखेने धाड टाकून कारवाई केली. ही कारवाई बुधवारी रात्री उशीरा करण्यात आली. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, लॉकडाऊनपासून शहरातील हॉटेल, बीअर बार आणि परमिट रुममध्ये ग्राहकांना बसण्यास मनाई आहे. असे असतांना बायपासवरील हॉटेल दरबार येथे ग्राहकांना विनापरवानगी मद्य पिण्यासाठी टेबल खुर्ची, पाणी आणि ग्लास उपलब्ध केल्या जाते, अशी माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल , कर्मचारी शिवाजी झिने , राजेंद्र साळुंके आणि संदीप क्षीरसागरसह अन्य कर्मचारी यांनी बुधवारी रात्री हॉटेल दरबारवर धाड टाकली.
त्यावेळी तेथे विविध टेबलवर तब्बल २५ ग्राहक दारू पित असल्याचे दिसून आले. हॉटेलचालक बालाजी माणिकराव खोकले आणि दोन कर्मचारी ग्राहकांना अन्न देत होते. प्रत्येकाच्या टेबलवर दारूची बाटली आणि ग्लास होते. या सर्वाना हॉटेलमध्ये सुरक्षित अंतरावर बसून त्यांची नावे आणि पत्ता विचारून त्यांना नोटीस देऊन गुरुवारी सकाळी ११ वाजता पुंडलिकनगर ठाण्यात हजर होण्याचे सांगितले. तर हॉटेलचालक बालाजी याला अटक करुन पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला.