घाटी रुग्णालयातील डीन बंगल्याचे दार १५ वर्षांनंतर उघडणार; अधिष्ठातांचा राहण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 02:16 PM2022-11-18T14:16:45+5:302022-11-18T14:17:03+5:30
घाटी रूग्णालयाच्या डीनचा परिसरातच राहण्याचा निर्णय
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) डीन बंगल्यात गेल्या १५ वर्षांत कोणतेही अधिष्ठाता राहिलेले नाही. त्यामुळे बंगल्याची दुरवस्था झाली आहे. काही खोल्या सध्या कार्यालयीन कामकाजासाठी वापरल्या जात आहेत. मात्र, नवनियुक्त अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांनी डीन बंगल्यात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
नियमानुसार, शासकीय वैद्यकीय व रुग्णालयातील अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी व इतरांनी कॅम्पसमध्ये राहणे बंधनकारक असताना, मागील १५ वर्षांपासून घाटीचे अधिष्ठाताच कॅम्पसमध्ये राहत नाहीत. डॉ. निमाले हे घाटीच्या डीन बंगल्यामध्ये राहणारे शेवटचे अधिष्ठाता होते. त्यांच्यानंतर घाटी रुग्णालयाच्या कॅम्पसमध्ये एकही अधिष्ठाता राहिलेले नाहीत.
अधिष्ठातापदी रुजू झाल्यानंतर डाॅ. संजय राठोड यांनी डीन बंगल्याची पाहणी केली. या ठिकाणी काही खोल्यांमध्ये सध्या पंतप्रधान जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना यांचे मदत केंद्र आहे. हे केंद्र इतरत्र स्थलांतरित करून डीन बंगल्याची दुरुस्ती केली जाणार आहे.
रुग्णसेवेवर राहणार वचक
सध्या सायंकाळनंतर संपूर्ण अपघात विभाग केवळ निवासी डॉक्टरांच्या भरवशावर राहतो. रात्री कधीतरी सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक किंवा विभागप्रमुख राहत असल्याची परिस्थिती आहे. रात्री विभागप्रमुख, सहयोगी प्राध्यापक किंवा सहायक प्राध्यापकांनी अपघात विभागात असणे बंधनकारक नाही, असा युक्तिवाद केला जातो. रात्री काही घटना घडल्यानंतर वरिष्ठांना धावत घाटी गाठावी लागते. परंतु, आता अधिष्ठाताच घाटी परिसरात राहणार असल्याने रुग्णसेवा सुरळीत राहण्यासाठी वचक निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.